

वेंगुर्ले : थोर संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांचे महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात अद्ययावत असे बॅ. नाथ पै समुदाय केंद्र साकारल्याने त्यांच्या कार्याचा विस्तार होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळे बॅ. नाथ पै यांचे आदर्श जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खा. शरद पवार यांनी वेंगुर्ले (दि.२४) येथे बोलताना केले.
खा. शरद पवार हे खाजगी दौऱ्यानिमित्त आज वेंगुर्ले येथे आले होते. यावेळी त्यांनी वेंगुर्ले येथील बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्र येथे भेट दिली. यावेळी त्यांनी संबोधित करताना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अदिती पै , संस्थेचे पदाधिकारी सचिन वालावलकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, फोमेंतो रिसॉर्टचे चेअरमन टिंबलो, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉन्टस लॉ कॉलेजचे व्हिक्टर डॉन्टस आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.संजय भावे, अदिती पै, टिंबलो आदींनी मार्गदर्शन केले.
शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी पवार यांच्या हस्ते बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्राच्या वेबसाईटचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी अदिती पै यांच्या हस्ते शरद पवार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उमेश गाळवणकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत आदिती पै यांनी, सूत्रसंचालन व आभार सचिन वालावलकर यांनी मानले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले , अमित सामंत, इर्शाद शेख, नम्रता कुबल , प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार ओंकार ओतारी , मुख्याधिकारी नातू, पोलिस निरीक्षक संदीप भोसले, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, नागरिक, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.