
सावंतवाडी : महायुतीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार आणि गेल्या तीन टर्मचे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून बॅनर वॉर सुरू असून, त्यांच्या विरोधात अनेक बॅनर लाऊन विविध प्रश्नांचे जाब विचारत त्यांच्यावर टीका केली जात आहे. अशातच बुधवारी पुन्हा सावंतवाडी बसस्थानक परिसरात दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर लावून अज्ञाताने जाब विचारला आहे.
या बॅनरद्वारे त्यांना राणे यांचा दहशतवाद संपला का? असा प्रश्न विचारत 2014 साली पालकमंत्री झाल्यावर रमेश गोवेकर प्रकरण?, अंकुश राणे प्रकरण?, रमेश शंकर मणचेकर प्रकरण?, रावजी वाळंजू प्रकरण? या सर्व गुन्ह्यांची चौकशी करणार होतात त्यांचे काय झाले?असा सवाल विचारला आहे.(Maharashtra assembly poll)
काही वर्षांपूर्वी वेंगुर्ला येथे राणे पिता-पुत्रांचा दहशतवाद दिसला. परंतु, काही दिवसांपूर्वी मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांनी पोलिसांसोबत घातलेले धुमशान आपल्याला मान्य आहे का? वेळोवेळी संस्कृतीची भाषा करणार्या दीपक केसरकर यांना ही संस्कृती मान्य आहे का? असे सवाल विचारले आहेत. परंतु, हा बॅनर कोणी लावला याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र या बॅनरची जोरदार चर्चा मतदारसंघात चालू आहे.