

बांदा : बांदा येथील कावेरी हॉटेलला बुधवारी (24 सप्टेंबर) रात्री 10.30 वा. च्या सुमारास अचानक आग लागली. प्राथमिक तपासात आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे समोर आले आहे. हॉटेल सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही, पण हॉटेलमधील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
हॉटेल सुरू असताना अचानक फ्रीजच्या मागील बाजून धूर निघू लागला आणि काही क्षणात आग पेटली. त्यावेळी हॉटेलमध्ये ग्राहक उपस्थित होते. कर्मचार्यांनी सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
त्यांनी पाणी व वाळू वापरून आग आटोक्यात आणण्यास मदत केली. अग्निशमन दलाची गाडी दाखल होण्यापूर्वीच स्थानिकांनी आग आटोक्यात आणली. या कामात बांदा पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, निखिल मयेकर, भाऊ वाळके, विकी कदम आणि अनेक स्थानिक सहभागी झाले.
प्राथमिक तपासात आगीचे कारण उंदरांनी वीजेची केबल कुरतडल्यामुळे झालेला शॉर्टसर्किट झाल्याचे समोर आले. हॉटेल मालक आणि स्थानिकांनी बचावात मदत केलेल्या लोकांचे कौतुक केले. या घटनेबाबत बांदा पोलिस ठाण्यात नोंद नाही.