

बांदा : भरधाव वेगात कार चालवून दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक राहुल शरद कुबल (40, रा. पुणे) याला बांदा पोलिसांच्या पथकाने पुणे-बाणेर येथून गुरुवारी अटक केली. तसेच त्याची अपघातग्रस्त डस्टर ताब्यात घेण्यात आली. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी येथे 27 एप्रिल 2025 रोजी झाला होता.
याप्रकरणी बांदा पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. बांदा पोलिस कार चालकाच्या मागावर होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी कार चालकाचा शोध घेतला.
चालक पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बांदा पोलिसांच्या पथकाने त्याला पुण्यातून शिताफिने ताब्यात घेतले. सहा. पोलिस उपनिरीक्षक सिताकांत नाईक, हवालदार धनंजय नाईक, सुशांत हेर्लेकर यांनी ही कारवाई केली. कार चालकाला शुक्रवारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सहा. पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले.