

बांदा : बांदा, इन्सुली, विलवडे आणि झाराप परिसरात झालेल्या घरफोडीच्या मालिकांमागील एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बांदा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत धीरज दिलीप गुप्ता (वय 20, रा. नॉर्थ गोवा) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी तीन आरोपींचा समावेश असून ते अद्याप फरार आहेत.
गुप्त माहितीद्वारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान अटक धीरज गुप्ता याने इन्सुली, विलवडे, बांदा आणि झाराप परिसरातील घरफोडी प्रकरणांतील सहभागाची कबुली दिली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले काही साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याला बांदा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 16 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी दिली.
उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू असून लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. सहा. पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहभागी झाले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे या गंभीर घरफोडी प्रकरणातील महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला असून पुढील तपास सुरू आहे.