

देवगड ः वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या जन्मगावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल, असे स्मारक उभे करू, याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्याचा आपला संकल्प असून त्या द़ृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत.बाळशास्त्रीनी त्यांच्या लहान वयातच केलेल्या कामाचा परिचय होऊ शकेल, या पद्धतीने स्मारकाचे महत्व वाढविणार आहे.आजच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी जो एकत्र येत एकसंघ दाखविला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘पोंभुर्ले’गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असेट आहे, असे मत पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केले.
वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांच्या गुरूवारी त्यांचे जन्म गाव पोंभुर्ले येथे साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना. राणे बोलत होते. माजी आ.अजित गोगटे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, देवगड तहसीलदार रमेश पवार, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, गणेश जेठे, देवगड तालुका पत्रकार समिती तालुकाध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पोंभुर्ले सरपंच प्रियांका धावडे, सुधाकर जांभेकर, उपसरपंच सादिक डोंगरकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, पत्रकार, शासकीय अधिकारी उपस्थित होते.
या नियोजित स्मारकाबाबत जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांनी एकत्र बसून चर्चा करा. हा विषय आता तुम्ही मार्गी लावायचा आहे. ज्या प्रमाणे सिंधुदुर्गनगरीत पत्रकार भवन उभे केले, त्याप्रमाणे पोंभुर्लेतील बाळशास्त्री स्मारकाचे काम आपणाला लवकर मार्गी लावायचे आहे या स्मारकासाठी लागणारा नधी व मदत आपण द्यायला तयार आहोत, असे ना. राणे यांनी सांगितले. यावेळी देवगड तालुका पत्रकार समिती व जांभेकर कुटुंबियांच्या वतीने मंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, तसेच उपस्थित मान्यवरांचा सम्मान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रवासावर आधारित लिहिलेल्या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाभरातील पत्रकार यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनघा मगदूम यांनी केले. आभार श्रीकृष्ण रानडे यांनी मानले.
पत्रकारिता कशी असावी, त्यातून कशी समाजसेवा करावी, याचे प्रबोधन बाळशास्त्रीनी आपल्या ‘दर्पण’ मधून केले. मराठी बरोबर त्याची इंग्रजी आवृत्ती सुरू केली. त्याला त्या काळी खूप मागणी असायची. इतक सुंदर लेखन त्यामध्ये असायचे. ‘दर्पण’ वृत्तपत्र म्हणजे नावाला साजेसा समाजमनाचा ‘आरसा’ होता. आताही त्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे.समाजकारण,राजकारण करत असताना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत, हे विसरू नका. सरकार, शासन, प्रशासन, न्याय व्यवस्था याकडून काही चुका होत असतील तर त्या आपण निर्भयपणे दाखविल्या पाहिजेत, असे मत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केले.