

निर्णय राऊत
आंबोली : सह्याद्रीतील जैवविविधतेच्या संपन्नतेत अतिमहत्वाच्या घटकापैकी एक घटक म्हणजेच जगातील सर्वात मोठा तथा वैशिष्टयपूर्ण आकर्षक असा 'ॲटलास मॉथ' हा पतंग होय! 'ॲटलास मॉथ'चे दर्शन होने हेही दुर्मिळच मानले जाते. त्यामुळे हा पतंग ज्या प्रदेशात आढळतो, तो प्रदेश जैवविविधतेने समृद्ध असल्याचेच मानले जाते. तर कोकणातील विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ॲटलास मॉथ'चा सुरक्षित अधिवास समजला जातो. तसेच अंडी, अळी ते पतंग अन् आयुष्य अवघे एक ते दोन आठवडा, असा जीवनचक्र असलेला हा आगळा - वेगळा असा 'ॲटलास मॉथ' आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानच याचे दर्शन
'ॲटलास मॉथ' हा जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असून सह्याद्रीच्या समृद्ध जैवविविधतेचा तो एक महत्त्वाचा बायोइंडिकेटर मानला जातो. हा कीटक दिसायला फुलपाखरासारखा असला तरी तो एक निशाचर व आकर्षक असा पतंग आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये (उदा. कोकण - तळकोकण, आंबोली, गोवा, सातारा, लोहगडचे जंगल, माळशेज घाट, महाबळेश्वर, माणगाव, शिराळा, कोल्हापूर आणि तिलारी आदी जंगलात परिसर) पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर ते डिसेंबर/जानेवारी दरम्यान याचे दर्शन प्रामुख्याने घडते. त्यानंतर तो क्वचितच दृष्टीस पडतो. त्यामुळे दुर्मिळ ॲटलास मॉथ ला पाहणे व त्याला कॅमेराबद्ध करण्यासाठी निसर्ग व वन्यजीवप्रेमीं मधे मोठी क्रेझ असते.
दरम्यान, 'ॲटलास' हे पतंगांची अवस्था अंडी ते त्यांची वाढ अळी अवस्थेतील सहा मुख्य टप्प्यांत होते. यात पहिला टप्पा ४-५ दिवस, दुसरा ८-१० दिवस आणि तिसरा १३ ते १४ दिवसांचा असतो. चौथा, पाचवा आणि सहावा टप्पा अनुक्रमे १०-११ दिवस, १२-१३ दिवस आणि १४-१५ दिवस चालतो. त्यानंतर सुमारे ११.५ सेमी (४.५ इंच) लांबी गाठल्यानंतर, अळ्या कोशावस्थेत जातात. त्या वाळलेल्या पानांचा वापर करून सुमारे ७-८ सेमी लांबीचा, कागदासारखा कोश विणतात आणि रेशमी धाग्याच्या साहाय्याने तो झाडाच्या फांदीला जोडतात.
साठवलेल्या चरबीच्या ऊर्जेवरच अल्प जीवनकाळ
वातावरणीय परिस्थितीनुसार, सुमारे चार आठवड्यांनंतर या कोशातून पूर्ण वाढ झालेला पतंग बाहेर पडतो. मात्र, पूर्णपणे ते अळीच्या अवस्थेत जमा केलेल्या चरबीच्या साठ्यावर जगतात. यामुळे पूर्ण विकसित झालेल्या प्रौढ ॲटलास मॉथला तोंड किंवा पचनसंस्था नसते. त्यामुळे तो आयुष्यभर काहीही खाऊ शकत नाही. तर प्रौढ अवस्थेत आल्यानंतर हा पतंग केवळ ५ ते ७ दिवस (किंवा जास्तीत जास्त २ आठवडे) जगतो. सुरवंट (कॅटरपिलर) असताना शरीरात साठवलेल्या चरबीच्या ऊर्जेवरच तो त्याचा हा अल्प जीवनकाळ काढतो. प्रौढ ॲटलस पतंग हा अतिशय कमजोर असतो. आणि अस्थिरपणे उडतात. ऊर्जा वाचवण्यासाठी, हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात. ही निसर्गाची अद्भुत रचनाच म्हणावी लागेल!
पंखांची टोके ही हुबेहूब नागाच्या तोंडासारखी
महाकाय आकाराच्या या पतंगाच्या पंखांचा विस्तार २५ ते ३० सेंटीमीटर (१० ते १२ इंच) पर्यंत किंवा अधिक असतो. तर पंखांच्या एकूणच क्षेत्रफळाचा विचार केल्यास हा जगातील सर्वात मोठा आणि आकर्षक असा पतंग ठरतो. तर याच्या पंखांची टोके ही हुबेहूब नागाच्या किंवा सापाच्या तोंडासारखी दिसतात. यामुळे पक्षी किंवा इतर शिकारी प्राणी त्याला खाण्यास धजावत नाहीत, जे त्याचे एक उत्तम स्वसंरक्षण तंत्र आहे. पंखांवर नकाशेवजा रेखीव नक्षी असल्यामुळे त्याला 'ॲटलास' हे विशेष नाव मिळाले आहे.
ॲटलास मॉथच्या जीवनाचे फक्त एकच उद्दिष्ट - 'प्रजनन'
'ॲटलास मॉथ' ह्या पतंगाचे प्रौढ आयुष्य केवळ प्रजननासाठी असते. मादी पतंग हवेत 'फेरोमोन्स' नावाचे संप्रेरक सोडते, ज्याचा गंध घेऊन नर पतंग कित्येक किलोमीटरवरून तिच्याकडे आकर्षित होतो. तर प्रौढ पतंग वर्षभर उडताना आढळू शकतात, परंतु सप्टेंबर ते डिसेंबर/जानेवारी दरम्यान ते सर्वाधिक संख्येने आढळतात. तसेच प्रजनन आणि अंडी (१०० ते २५० अंडी) घालण्याचे कार्य पूर्ण झाल्यावर या दोन्ही पतंगांचा मृत्यू होतो. तर पश्चिम घाटातील दलचिनी, लिंबू, पेरू आणि जांभळाच्या झाडांवर याचे सुरवंट प्रामुख्याने वाढतात.
'ॲटलास मॉथ'साठी धोके आणि संवर्धन!
अधिवासक्षेत्रातील हवामान बदल, पतंग पकडणे, प्रकाश प्रदूषण, कीटकनाशके, तसेच अधिवासाचा ऱ्हास आणि विखंडन या सर्वांचा 'ॲटाकस ॲटलस' आणि इतर महाकाय पतंगांच्या संख्येवर नकारात्मक परिणाम होतो. तर माहितीच्या कमतरतेमुळे जरी या प्रजातीचा समावेश IUCN च्या 'रेड लिस्ट'मध्ये (धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत) केलेला नसला, तरीही ॲटलस मॉथ 'धोक्यात असलेली प्रजाती' (threatened species) ठरण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करते. तसेच 'ॲटलस मॉथ' हा त्याच्या अधिवासावर (उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय पर्जन्यवने, दुय्यम वने आणि झुडपी वने) अवलंबून असतो. आणि याच कारणामुळे, "या परिसंस्थांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाची 'फ्लॅगशिप प्रजाती' (प्रतिनिधी प्रजाती) बनण्याची क्षमता यात आहे."
फुलपाखरे आणि पतंग मधील फरक!
फुलपाखरे आणि पतंग हे दोन्ही 'लेपिडोप्टेरा' या एकाच वर्गातील कीटक असले तरी त्यांच्या सवयी, शारीरिक रचना आणि जीवनचक्रात काही महत्त्वाचे फरक असतात. यात सक्रिय असण्याची वेळ जसे फुलपाखरे प्रामुख्याने दिवसा सक्रिय असतात (दैनिक), तर पतंग सहसा रात्रीच्या वेळी बाहेर पडतात आणि निशाचर असतात. तर फुलपाखरांचे अँटेना लांब, पातळ आणि टोकाला गोल (गदाकृती) असतात. याउलट, पतंगांचे अँटेना पिसांसारखे (फेदरी) किंवा कंगव्यासारखे जाड व लहान असतात. तसेच फुलपाखरे विश्रांती घेताना त्यांचे पंख पाठीवर वरच्या बाजूला एकत्र करून बंद ठेवतात.
पतंग विश्रांती घेताना आपले पंख बाजूंना सपाट पसरवून ठेवतात. यासह फुलपाखरांच्या अंगावर अतिशय चमकदार, सुंदर आणि लक्षवेधी रंगांचे पंख असतात. पतंगांचे पंख तुलनेने निस्तेज, तपकिरी, राखाडी किंवा काळ्या रंगाचे असतात, जे त्यांना लपण्यास मदत करतात. फुलपाखरांचे शरीर सडपातळ आणि गुळगुळीत असते. पतंगांचे शरीर अधिक मजबूत, स्थूल आणि बारीक केसांनी किंवा लव (furry) झाकलेले असते. फुलपाखरे रूपांतरणाच्या काळात कडक व गुळगुळीत असा 'क्रिसालिस' तयार करतात. तर पतंग स्वतःभोवती रेशमी धाग्यांपासून मऊ 'कोकून' विणतात.