

देवगड ः तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगाला दया, क्षमा, शांतीचा विचार दिला. राजवैभव त्यागून मानवी जीवनातील समाधान व शांती शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यातूनच त्यांनी बौद्ध धम्माची स्थापना करत जगाला शांतीचा संदेश दिला. ‘सुखाच्या सर्वच गोष्टीत आपल्याला समाधान मिळते असे नाही तर मनाची समाधी महत्त्वाची आहे’ व मनाला समाधी प्राप्त करायची असेल तर आपण आत्मबोध केला पाहिजे, हे भगवान गौतम बुद्धांचे विचार जगातील समस्त मानवजातीला आत्मिक समाधानाचा मार्ग दाखविणारे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक विभाग व कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.
देवगड तालुक्यातील गिर्ये बुद्ध विहाराचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम सोमवारी झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ना. शेलार उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, स्वागताध्यक्ष सरपंच सौ. लता गिरकर, पद्मश्री दादा इदाते, माजी आ. अॅड. अजित गोगटे, कमलाकर दळवी, अतुल काळसेकर, भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, आरिफ बगदादी, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, रवींद्र तिर्लोटकर, डॉ. अमोल तेली, गिर्ये बौद्धजन विकास मंडळाचे मुंबई अध्यक्ष भरत गिरकर, सरचिटणीस संजय शंकर गिरकर, ग्रामीण शाखा अध्यक्ष संतोष भिकाजी गिरकर, सरचिटणीस सचिन गिरकर, भंते शांतीदीप व भंते कस्यप आदी उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवी बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच बुद्ध मूर्तीची स्थापना भन्ते शांतीदीप व कस्यप यांनी बुद्ध पूजापाठ विधिवत केला. ना. नितेश राणे व ना. आशिष शेलार यांच्या हस्ते पंचशील ध्वजरोहन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रदर्शनीय चित्राचे अनावरण करण्यात आले.
ना. शेलार म्हणाले, जगाला शांतीचा मार्ग तथागत भगवान गौतम बुद्धांनी ज्या पाली भाषेतून दिला, त्या पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जागर संविधानाचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचा प्रचार करण्याचे काम शासन करीत आहे. गिर्ये येथे बुद्धविहाराचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम माजी मंत्री ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांनी घडवून आणला, ही आभिमानास्पद बाब आहे. भाई गिरकर यांनी 50 वर्षांपूर्वी सर्वांच्या प्रयत्नातून विहार उभारले होते. आज पुन्हा नव्याने त्याची उभारणी केली आहे. आभार सरचिटणीस सचिन गिरकर यांनी मानले.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, आज भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी होते आहे. हा आनंदाचा दिवस आहे. जिल्ह्यात दोन महत्त्वाचे कार्यक्रम झाले. त्यामध्ये मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला, तर आज गिर्ये येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले आहे. माझ्या प्रत्येक निवडणुकीची सुरुवात भाईंच्या आशीर्वादाने सुरुवात होते. त्यांचा शब्द आम्ही सर्व कार्यकर्ते आदेश म्हणून पाळतो. विजयदुर्ग येथे सुसज्ज बंदर होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. गणपतीला मुंबई ते विजयदुर्ग अशी रोरो बोट सेवा सुरू होत आहे. 25 मे रोजी बोटीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. येत्या पाच वर्षांत या जिल्ह्याचा विकासात्मक कामातून कायापालट केला जाईल, हा आपला शब्द आहे.
माजी मंत्री भाई गिरकर म्हणाले, 50 वर्षांपूर्वी आपण अध्यक्ष असताना या विहाराची सर्व गिरकर बंधूंनी उभारणी केली. आज नवीन उभारणी करताना सर्व गिरकर बंधूंनी स्वतःचा पैसा खर्च करून हे भव्य विहार बांधले, याचा अभिमान आहे. विशेष म्हणजे या विहारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी कलश ठेवण्यात आले आहे. थायलंड येथून बुद्ध मूर्ती आणली असून त्याची स्थापना करण्यात आली आहे. गावाच्या विकासाबाबत बोलताना, गिर्ये येथील बंद असलेल्या पवनचक्की प्रकल्पाच्या जागी सोलर प्रकल्प उभारावा. तसेच येथील तरुणाचा हाताला रोजगार मिळावा यासाठी गिर्ये-नाणार प्रकल्प झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. माजी आ. अजित गोगटे यांनीही मनोगत व्यक्त केले.