

पोईप ः मालवण-बेळणे मार्गावरील असगणी फाटा ते राठीवडे या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी जिल्हा वार्षिक योजनेतून पूर्ण करण्यात आले. दरम्यान, या रस्त्याची उर्वरित कामे जसे की संरक्षक भिंती, मोर्यांचे बांधकाम, साईडपट्ट्यांचा भराव आदी कामे ठेकेदाराने अलीकडेच सुरू केली आहेत. मात्र, सदर कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी आल्याने राठीवडे सरपंच दिव्या धुरी, उबाठा शिवसेना कार्यकर्ते सुभाष धुरी व ग्रामस्थांनी या सर्व कामांची पाहणी केली असता, ती निकृष्ट दर्जाची होत असल्याचे दिसून आल्याचे सरपंच दिव्या धुरी यांनी सांगितले.
या कामांतर्गत काँक्रिट मिक्स्चर मध्ये वाळूऐवजी क्रशर पावडर वापरली जात असून सिमेंटही कमी प्रमाणात वापरले जात आहे. याबाबत सरपंच व ग्रामस्थांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंत्यांकडे तक्रार केली आहे. मात्र संबंधित अधिकार्यांनी अद्याप या तक्रारीची दखल घेतलेली नाही. याबाबत राठीवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आता पुन्हा एकदा त्यांच्याजवळ तक्रार नोंदविण्यात आली असून सा. बां. अभियंत्यांनी दखल न घेतल्यास आपण सा. बां. च्या वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार आहे. तसेच शासकीय कामात होत असलेला हा भ्रष्टाचार पालकमंत्री नितेश राणे व आ. नीलेश राणे यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सरपंच धुरी यांनी सांगितले.