आरवली श्री देव वेतोबा वाढदिवस सोहळा

कोकणचा 'तिरूपती'!
आरवली श्री देव वेतोबा वाढदिवस सोहळा
आरवली श्री देव वेतोबा वाढदिवस सोहळा
Published on
Updated on
Summary

'कोकणचा तिरूपती' म्हणून प्रसिद्ध आरवली गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव वेतोबा हे कोकण प्रांतातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात 'हरवल्ली' या नावाने हा गाव अस्तित्वात होता. या गावाच्या क्षेत्रामध्ये श्री देव कोकणेश्वर, श्री देव रामेश्वर, श्री देव सिध्देश्वर, श्री देव परमनाथ व श्री देव लिंगेश्वर अशी 'हर' म्हणजे शंकराच्या देवालयांची मालिका होती. यासाठी हे गाव त्यावेळी 'हरवल्ली' म्हणून ओळखले जात असे. 'हर' म्हणजे 'शिव' आणि 'वाली' या शब्दाचा अर्थ वस्ती. 'हरवल्ली' या शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन 'आरवली' हा शब्द अस्तित्वात आला. त्यावेळी पोर्तुगीजांकडून होणाऱ्या धर्मांतराच्या जाचाला कंटाळून गोव्यातील अनेक कुटुंबांनी कोकणात व इतरत्र स्थलांतर केले, त्यावेळी काही सारस्वत घराणी आरवली गावात वस्तीला आली. त्यातील एक नाथपंथीय सिध्दपुरुष, श्री भुमैय्या यांनी सुमारे १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात श्री देव वेतोबा देवालयाची स्थापना केली असावी. आज मंगळवार २१ एप्रिल २०२६ रोजी या वेतोबा देवाचा वाढदिवस साजरा होत आहे.

सात खणांच्या डोंगरीतून भूमैय्याने १७ व्या शतकाच्या दरम्यान हे देवालय आजच्या जागेत आणले असावे, असा अंदाज आहे. भूमैय्या हे संत मद्रासी होते. भूमीच्या मात्रेतून ज्याचा जन्म झाला तो भूमैय्या! हा संत अधिकारपदास पोहोचला होता. तांत्रिक विद्येवर प्रभुत्व असलेला तो एक महान संत होता. त्याने कोकणात अनेक ठिकाणी रवळनाथ व वेताळांच्या मंदिरांची स्थापना केली. त्याला शाबरी विद्या अवगत होती. वेतोबाची स्थापना या भूमैयाने शाबरी विद्येनेच केली. ग्रामीण भागात एखादया गूढ झाडाखालील शिळेला वेताळ मानले जाते. तेथे सात-सातरी, पांच मेंढारी, बान काशी। जात धनगरी, येशील राजा, जाशील राजा। गाव वेस, मालकी आठ अठार। द्वारा पुत्रा राखण कर। असे गाऱ्हाणे घातले जाते.

आरवली गावचे वेतोबा मंदिर हे मूळतः वेताळाचे मंदिर आहे. आपल्याकडे 'बा' हा शब्द आदरार्थी वापरला जातो. त्यामुळे वेतोबा हा शब्द रूढ झाला असावा. वेताळ या शब्दातील महात्म्यसुध्दा अर्थपूर्ण आहे. वेताळ या शब्दातील पहिले अक्षर वेगळे काढले तर उरतो ताल, दसरे अक्षर बाजूला काढले तर उरतो वेळ आणि तिसरे अक्षर बाजूला काढले तर उरतो वेवा. म्हणजे वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती तो 'वेताळ' होय. वेताळामध्ये भुता-खेतांना, अपप्रवृत्ती शक्तींना विरोध करणारी शक्ती असते. या मंदिराची दुसरी प्रतिष्ठापना अंदाजे १८ व्या शतकात झाली असावी. तिसरी प्रतिष्ठापना १८४३ साली व चौथी प्रतिष्ठापना २३ एप्रिल १९२० साली झाली. त्यावेळी स्थापन केलेली मूर्ती आकेरी येथील राघोबा मेस्त्री व त्यांचे दोन मुलगे रामचंद्र व लक्ष्मण यांनी बनविली होती.

पाचवी प्रतिष्ठापना २२ एप्रिल १९९६ रोजी होऊन आताची पंचधातूंची मूर्ती बसविण्यात आली. कन्याकुमारी येथे उभारलेले स्वामी विवेकानंदांचे शिल्प घडविणारे थोर शिल्पकार व १९२० साली ज्यांनी श्री वेतोबाची लाकडी मूर्ती घडविली होती ते लक्ष्मण मेस्त्री यांचे सुपूत्र नारायण सोनवडेकर (मेस्त्री) खार-मुंबई यांनी ही पंचधातूंची मूर्ती तयार केली आहे. यापूर्वी वेतोबाची मूर्ती फणसी लाकडाची होती. त्यामुळे आरवली गावात इमारतीसाठी व व्यवहारात फणसाचे लाकूड वापरले जात नाही. वेतोबाच्या मूर्तीस 'सलाई' झाडाच्या पानांचे ३३ प्रसाद (कौल) लावण्याची प्रथा आहे. इच्छापूर्तीसाठी वेतोबास नवस करताना पादुका जोड दिला जातो.

या नवसांच्या माध्यमातून पादुका जोडांची संख्या वाढत गेल्यामुळे वेतोबाला प्रसादी कौल लावून आता कायमस्वरूपी चांदीचा पादुका जोड तयार केला आहे. श्री देव वेतोबाला केळ्यांच्या घडांचा नवस केला जातो. नवसाला पावणाऱ्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या वेतोबाच्या दर्शनासाठी दशक्रोशीतील भाविकांवरोबरच गोवा, बेळगाव, मुंबई, कोल्हापूर व गुजरात येथून भाविक वाढदिवसाला तसेच वर्षभर येत असतात. कोकणातील प्रमुख दैवतांपैकी एक, भक्तांच्या इच्छेला पावणारा भक्तवत्सल तर दुर्जनांसाठी तळपती तलवार हाती घेवून दक्ष असलेल्या श्री देव वेतोबाला अंत:करणपूर्वक नमस्कार।

शब्दांकन व संकलन एस. एस. धुरी (आरवली)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news