

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावाचे ग्रामदैवत आणि संपूर्ण पंचक्रोशीचा राखणदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव वेतोबाच्या वार्षिक सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री देव वेतोबाला पांडुरंगाच्या रूपात अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली होती.
गळ्यात तुळशीची माळ, कंबरेवर हात आणि सावळ्या विठुरायाच्या पारंपरिक वेशातील श्री देव वेतोबाचे हे मनमोहक रूप भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. या अलौकिक आणि विलोभनीय दर्शनासाठी आरवलीसह परिसरातील भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर अत्यंत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.वार्षिक सप्ताहानिमित्त मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून श्री देव वेतोबाचे दर्शन घेत आहेत आणि या भक्तिमय सोहळ्याचा आनंद लुटत आहेत.
नवसाची अनोखी परंपरा
आरवलीच्या श्री देव वेतोबाला नवस म्हणून केळीचा घड आणि खास चामड्याच्या चपला अर्पण करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जाते. यामुळे या जागृत देवस्थानाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सर्वदूर अधोरेखित होते.