

ओरोस ः सन 2023-24 साठी कोकण विभागातून कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सह. बैंक पुरस्कार सिंधुदुर्ग बँकेला जाहीर झाला आहे. त्यामुळे बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन, मुंबई यांचेमार्फतसन 2023-24 करिता दिला जाणारा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक पुरस्कार कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाला असून महाराष्ट्रातील जिल्हा बँकांसाठी हा मानाचा पुरस्कार मानला जातो. सन 2023-24 करिता कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासीयांच्या मनात विश्वासाचे नाते तयार झाले असून जिल्ह्याच्या विकासामध्ये सिंधुदुर्ग बैंकेचा सिंहाचा वाटा आहे. बैंकेस मिळालेल्या या पुरस्कारामुळे बँकेने साधलेली सर्वांगीण प्रगती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
कै. वैकुंठभाई मेहता हे भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते होते. त्यांनी बॉम्बे स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजे आताची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुमारे 35 वर्षे कामकाज सांभाळले. ही बँक म्हणजे सबंध मुंबई व राज्यातील ग्रामीण पुनर्रचना कार्याचे केंद्र बनवले. वैकुंठ भाईंचे जीवन म्हणजे सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यांच्या विकासार्थ देशासाठी सेवारत झालेले शांत समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण होय. म्हणूनच त्यांच्या नावाने जाहीर होणार हा पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक असोसिएशन, मुंबई यांच्यामार्फत दिला जातो.
जिल्हा बँकेने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असतानाच ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्ज वसुली, ढोबळ व निव्वळ नफा यामध्ये बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे. बँकेने सन 2024-25 साठी 6000 कोटीच्या व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवले होते. आणि बँकेने यावर्षी एकूण 6094.75 कोटीच्या व्यवसायाचा टप्पा गाठून या उद्दिष्टांची पूर्तता केली आहे. अत्याधुनिक डिजिटल बैंकिंग सेवेमध्ये सुद्धा सिंधुदुर्ग बैंकेने आपला स्तर कायमच उंचावत ठेवला असून ग्राहकाकडून डिजिटल सेवांना मिळणारा वाढता प्रतिसाद ही त्याची पोच पावती आहे. बँकेच्या व्यवहारातील पारदर्शकता प्रतिबिंबित करणारा विविध लेखापरिक्षणातील मिळणारा ‘अ’ वर्ग गेली अनेक वर्ष कायम राखण्यात बँकेला यश मिळाले आहे.