

कणकवली ः महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक म्हणून ओळख असलेला दैनिक ‘पुढारी’ 86 वर्षांची वाटचाल पुर्ण करून बुधवार 1 जानेवारी 2025 रोजी 87 व्या वर्षात पदार्पण करत आहे. महाराष्ट्र, गोवा, बेळगाव याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दैनिक ‘पुढारी’ची घोडदौड वेगाने सुरू आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने बुधवार, 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. पासून सिंधुदुर्ग आवृत्तीच्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी 4 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा होणार आहे.
या सोहळयासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात दैनिक ‘पुढारी’ सिंधुदुर्ग आवृत्तीने प्रसिद्ध केलेल्या ‘ए. आय. महाक्रांती’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. तरी या सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक, वाचक, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते आणि दैनिक ‘पुढारी’ प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख गणेश जेठे व पुढारी परिवारातर्फे करण्यात आले आहे.