Amboli Waterfall : पर्यटकांचे आकर्षण असलेला आंबोली धबधबा प्रवाहित

वर्षा पर्यटन हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता; स्थानिक, व्यावसायिकांतून समाधान
Amboli Waterfall
पर्यटकांचे आकर्षण असलेला आंबोली धबधबा प्रवाहित
Published on
Updated on
नागेश पाटील

सावंतवाडी : महाराष्ट्राचे ‘प्रति महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंबोलीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील प्रसिद्ध धबधबा आतापासूनच प्रवाहित होऊ लागला आहे. यामुळे लवकरच पर्यटन हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहेत. यामुळे स्थानिक आणि व्यावसायिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आंबोली वर्षा पर्यटनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. परिसरातील आंबोली, गेळे आणि चौकुळ ही तीन गावे नयनरम्य निसर्गसौंदर्य, घनदाट धुके, फेसाळणारे धबधबे आणि जैवविविधतेसाठी वर्षा पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत. दरवर्षी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसह देशभरातून लाखो पर्यटक आंबोलीचा पाऊस, धुके आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. पावसाळ्यातील पहिलेे दोन-तीन महिने या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते.

पर्यटकांचे आकर्षण केंद्रे

आंबोली घाटातील प्रसिद्ध धबधबे, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळ, महादेव गड पॉईंट, वनबाग, फुलपाखरू उद्यान यांसारखी विविध पर्यटनस्थळे वर्षा पर्यटकांना खुणावत असतात. याव्यतिरिक्त गेळे येथील कावळेसाद पॉईंट आणि चौकुळमधील विविध पर्यटन स्थळे देखील पर्यटकांना आकर्षित करतात. स्थानिक व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे.

पर्यटन वाढीसाठी वन विभागाचा पुढाकार

आंबोलीतील वर्षा पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, आ.दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने वन विभागाने पर्यटकांना पर्यटनस्थळांची सैर घडवण्यासाठी दोन वाहने सज्ज ठेवली आहेत. ही वाहने वन व्यवस्थापन समितीच्या ताब्यात देण्यात आली आहेत, ज्यामुळे पर्यटकांना आंबोली परिसरातील निसर्गाचा अधिक चांगल्या प्रकारे अनुभव घेता येईल.

लवकरच वर्षा पर्यटनाला सुरूवात!

आता मान्सून कोकणात दाखल झाला असून रविवार पासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जमिनीत पाणी मुरून झरे प्रवाहित होण्यासाठी असा हलका परंतू संततधार पाऊस महत्वाचा असतो. मान्सूनपूर्व पाऊस दमदार कोसळल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहित झाले आहेत. आता मान्सूनच्या आगमनामुळे लवकरच हे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतील व आंबोलीच्या वर्षा पर्यट हंगामास प्रारंभ होईल. सध्या आंबोलीमध्ये दाट धुके आणि रिमझीम पावसाचे वातावरण आहे. आता मृग नक्षत्र सुरू होताच आंबोलीमध्ये वर्षा पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news