

निर्णय राऊत
आंबोली : आंबोली परिसरात १५ जुलै पासून आता पर्यंत २५० इंच (६३५० मीमी) पावसाची नोंद झाली आहे. पाऊस असाच आता सक्रिय राहिल्यास सप्टेंबर अखेर पर्यंत ४०० इंच (१०,१६० मीमी) पावसाची नोंद होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान १ जून पासून १४ जुलै २०२६ पर्यंतच्या पर्जन्यमानाची नोंद प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उपलब्ध झाली नाही.
थेट अरबी समुद्रावरून येणारा पाऊस व वारा हा आंबोलीला धडकतो. तर बंगाल तथा हिंद महासागरातून येणारा पाऊस व वारा आदी हवामानाचा ही मोठा परिणाम आंबोलीत सहज दिसतो. त्यामुळे दरवर्षी आंबोलीत कोसळणारा पाऊस नेहमी सारखा नसतो. कधी हलका, मध्यम, निवांत, जोरदार, अतिजोरदार, मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य अशी बरीच रूपेही पावसाची आंबोलीत पहावयास मिळतात. हे विशेष! तर आंबोलीच्या पावसाची क्रेझ ही अतिशय रोमांच ने भरलेलीच असते. याच पावसाचाच अगदी मनमुराद आनंद घेण्यासाठीच दरवर्षी लाखो पर्यटक हे आंबोलीत येतात. त्यामुळे आंबोलीचे मुख्य पर्यटन हे पावसावरच अवलंबून असते.
यावर्षी पर्जन्य विभागाकडून मिळालेल्या माहीती नुसार १५ जुलै पासून आता पर्यंत २५० इंच पाऊसाची नोंद आंबोली परिसरात झाली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात आंबोलीत मुसळधार पाऊस कोसळतो. साधारण २४ तासात ८ इंच (२०३ मीमी) किंवा अधिकचा पाऊस कोळतो.
आंबोलीत सध्या निसर्गाचा मनमोहक नजारा
आंबोली परिसरात समाधान कारक पाऊस झालेला असून सद्या सर्वत्र अगदी स्वर्गिय देखावेच दिसत आहे. उत्साही करणाऱ्या वातावरणासह जंगल, घाट व दऱ्या ह्या हिरवाइने नटलेल्या आहेत. उंच डोंगर कड्यावरून कोसळणारे धबधबे, नद्या व नाले, घनदाट धुके व दऱ्यांमधे उतरलेले मेघ आदींचे मनमोहक दृश्य हे जणू डोळ्यांचे पारणे फेडतात. यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक हे आंबोली वर्षा पर्यटन हंगामात वर्षा पर्यटनाचा अगदी मनसोक्त आनंद घेतात.