

सावंतवाडी : सरकार आणि महावितरणला सर्वसामान्यांच्या किंवा मुक्या प्राण्यांच्या जिवाची काही किंमत आहे की नाही? असा संतप्त सवाल आंबोलीतील धक्कादायक घटनेमुळे उपस्थित होत आहे. महावितरणच्या ढिसाळ आणि गलथान कारभारामुळे आंबोली मुळवंदवाडी येथे वीज वाहक तार तुटून पडल्याने दोन जनावरांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. यामध्ये स्थानिक शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने मोठा अनर्थ आणि मनुष्यहानी टळली आहे.
शेतात चरताना काळाचा घाला
आंबोली-मुळवंदवाडी येथील शेतकरी भिसाजी महादेव सरमळकर यांची गाभण म्हैस आणि रेडकू नेहमीप्रमाणे शेतात चरायला गेले होते. मात्र, महावितरणची विद्युत भारीत तार तुटून जमिनीवर पडली होती. या पडलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने गाभण म्हैस आणि रेडकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत शेतकरी सरमळकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला!
घटना घडली त्यावेळी ग्रामस्थ गणपत गावडे यांनी प्रसंगावधान दाखवले. त्यांनी इतर जनावरांना पुढे जाण्यापासून रोखून धरले. यामुळे मोठा अनर्थ टळला पंचनाम्यासाठी टाळाटाळ; शेतकऱ्याचा आक्रमक पवित्रा या घटनेनंतरही महावितरण आणि महसूल प्रशासनाने मंगळवारी उशिरापर्यंत घटनेची दखल घेतली नाही. 'जोपर्यंत पंचनामा होत नाही आणि नुकसानभरपाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृत जनावरे हलवणार नाही', असा आक्रमक पवित्रा शेतकरी आणि ग्रामस्थांनी घेतला. अखेर प्रशासनाने बुधवारी सायंकाळी उशिरा पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नांगरतास भागात नव्याने बसवलेले विद्युत पोल धोकादायक पद्धतीने बसवण्यात आले आहेत. पावसाळ्यात तिथेही असाच मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ग्रामीण भागातील महावितरणचा भोंगळ कारभार आता लोकांच्या जिवावर उठला आहे. विद्युत अपघातात माणूस दगावल्यास केवळ ५ लाख रुपये देऊन सरकार जबाबदारी झटकते. अधिवेशनात आ. नीलेश राणे यांनीही या वाढत्या वीज अपघातांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्रीच ऊर्जा खात्याचे प्रमुख आहेत, मग आणखी किती बळी गेल्यानंतर सरकारला जाग येणार? असा संतप्त सवाल कोकणातील जनतेमधून विचारला जात आहे.