

आंबोली : या वर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने आंबोलीचा वर्षा पर्यटन हंगाम यंदा लवकर सुरू झाला. सुदैवाने पावसाचा जोर कायम राहिल्याने गेले दोन महिने आंबोलीत वर्षा पर्यटकांची विक्रमी गर्दी दिसून आली. दरम्यान आता श्रावण मास सुरू झाल्याने आज( 27 रोजी) रविवारी आंबोलीला भेट देणार्या वर्षा पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे चित्र होते. सहाजिकच वीकेंडला पर्यटकांच्या गर्दीमुळे होणार्या वाहतूक कोंडी किंवा इतर समस्या उद्भवल्या नाहीत.
आंबोली परिसरात गेले काही दिवस जोरदार वृष्टी सुरू आहे. त्यामुळे वर्षा पर्यटन हंगामातील व्यावसायिक दृष्ट्या महत्वाचे मागचे दोन आठवडे व त्यातील मुख्य गर्दीचे वीकेंड्स शनिवार व रविवार हे अतिवृष्टी व वीजेच्या समस्यांमुळे पर्यटन व्यवसायिकांच्या दृष्ट्या आर्थिक नुकसानात गेले आहेत. दरवर्षी श्रावण मास सुरू होण्याआधीचा वीकेंड म्हणजेच शनिवार-रविवार हे वर्षा पर्यटन हंगामातील शेवटचा मुख्य वीकेंड समजला जातो. या वीकेंडला दरवर्षी देशभरातील वर्षा पर्यटक आंबोलीत विक्रमी संख्येने गर्दी करतात. अन् आंबोली वर्षा पर्यटनाचा मनमुराद असा आनंद घेत असतात.
आंबोलीतील पावसासह धबधब्यांखाली तसेच नदी, ओहोळ अंघोळ करने तसेच जागा मिळेल तेथे पिकनिक (जेवण), पार्ट्या, मौज - मज्जा असे बेत या पर्यटकांचे असतात. मात्र, यंदा पर्यटन हंगामातील शेवटच्या वीकेंडला श्रावण मास सुरू झाल्याने तसेच देशभरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने याचा परिणाम रविवारी येथील वर्षा पर्यटनावर दिसून आला. आता सुरू झालेला श्रावण मास, त्यानंतर येणारा गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्रोत्सव यामुळे आंबोलीत येणार्या वर्षा पर्यटकांची संख्या कमीच रहाणार आहे.
सद्या आंबोलीत मुख्य धबधबासहीत इतर धबधब पूर्ण क्षमतेने कोसळत आहेत. त्यामुळे हे धबधबे र्यटकांचे विशेष आकर्षनाचे केंद्र बनले आहेत. येथील घनदाट धुके, जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा तसेच हवेत प्रचंड गारवा असे उत्साही करणारे आंबोलीचे वातावरण आहे. त्यामुळे आंबोली वर्षा पर्यटनाला भेट देणार्या सर्वच पर्यटकांना, प्रवाश्यांना आंबोलीची नेहमीच भुरळ पडते. सोबत आंबोली धबधब्यावर भिजून टपरी वरच्या गरमा गरम उफालेल्या चहा, भाजलेली कनसे, वडापाव, भजी आदीची मज्जा ही काही वेगळीच.