

Amboli Kavlesaad accident
आंबोली : येथील प्रसिद्ध कावळेसाद दरीत शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी कोसळलेल्या कोल्हापूर येथील पर्यटकाचा मृतदेह अखेर १८ तासांच्या अथक शोधकार्यानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. दाट धुके आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात मोठे अडथळे येत होते, मात्र एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकांनी ही मोहीम यशस्वी केली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा एक गट आंबोली येथे पर्यटनासाठी आला होता. शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा गट कावळेसाद पॉईंटवर असताना, राजेंद्र सनगर यांचा तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले. घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली, मात्र दाट धुके आणि अंधारामुळे शुक्रवारी शोधकार्य थांबवण्यात आले होते.
आज (शनिवारी, दि.२८) सकाळी नऊ वाजता एनडीआरएफचे पथक, आंबोली व सांगेली येथील सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर टीम, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. मोठ्या दोरखंडांच्या साहाय्याने बचाव पथकाचे सदस्य सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत उतरले. अखेर त्यांना राजेंद्र यांचा मृतदेह सापडला. डोक्याच्या बाजूने दरीत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृ
मृतदेह दरीतून बाहेर काढताच उपस्थित नातेवाईक आणि मित्रांनी आक्रोश केला, त्यामुळे वातावरण अत्यंत हृदयद्रावक झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी पर्यटक आणि स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.