

आंबोली ः आंबोली घाटातील चाळीस फूट मोरी परिसरात दरड कोसळून रस्त्यावर आली. गुरुवारी सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली. त्यामुळे या घाटमार्गातील दोन्हा बाजूंची वाहतूक ठप्प झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी दाखल होत ही दरड बाजूला केल्यानंतर दुपारपासून वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
आंबोली परिसरात सलग तीन दिवस पूर्वमौसमी पाऊस कोसळत आहे. पहिल्याच पावसात घाटातील दरडी खाली आल्या. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. दरड कोसळल्याने घाटमार्गात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग प्राधिकरणचे अभियंता रूपेश कांबळी यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करून एका बाजूने वाहतूक पूर्ववत केली. त्यानंतर जेसीबीने उर्वरित दरड हटविण्यात आली.
सलग तिसर्या वर्षी पावसाळ्यात एकाच ठिकाणी ही तिसरी घटना घडली आहे. दरम्यान, आंबोली परिसरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे घाटातील छोटे छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. घाटमाथ्यावरील ब्रिटिशकालीन संरक्षक गटारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घाटरस्ता करताना ब्रिटिशांनी घाटात दरडी कोसळू नये यासाठी डोंगरावरच गटारे बांधली होती. मात्र, माती दरड जाऊन ती बुजली आहेत. त्यामुळे पाणी जाण्यास वाट नसल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.