

Agriculture Assistants Strike in Vengurla
वेंगुर्ले: महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना राज्यस्तरीय आंदोलन अंतर्गत वेंगुर्ला येथील कृषी सहाय्यक यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आज (दि. ७) धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनात कृषी सहाय्यक लाडू जाधव, तालुकाध्यक्ष जीवन परब, सुरज परब, श्रेया चव्हाण, प्रियांका देऊलकर, स्नेहल रगजी, राजू गवाणे आदी सहभागी झाले आहेत.
कृषी सहाय्यक ते कृषी पर्यवेक्षक यांच्याप्रमाणे ४.१ याप्रमाणे करण्यात यावे, कृषी सहाय्यक सवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करण्यात यावे, कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहाय्यकांना नियमित कृषी सहाय्यक पदाचे आदेश देण्यात यावेत, कृषी विभागांमध्ये वाढत्या ऑनलाईन कामांचा व्याप लक्षात घेता कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात यावेत.
कृषी सहाय्यकांना कायमस्वरूपी मदतनीस देण्यात यावा, तसेच कृषी निविष्ठा वाटपामध्ये सुसूत्रता आणावी आदी विविध मागण्याकरिता हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनास शेतकरी संघटनेचे श्यामसुंदर राय, डॉ. विलास देऊलकर, ॲड. प्रकाश बोवलेकर, वैद्य आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.