

दोडामार्ग ः आडाळी एमआयडीसी क्षेत्रात अवैध माती उत्खनन जोरदार सुरू आहे. महसूल विभागाने या क्षेत्रात तब्बल 1565. 64 ब्रास अवैध मातीसाठी जप्त करून एमआयडीसी विभागास एकूण 56 लाख 36 हजार 304 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड सात दिवसात भरणा न केल्यास एमआयडीसी विभागाविरुद्ध फौजदारी कारवाई करून या रकमेचा बोजा संबंधित सातबारावर ठेवण्यात येईल, असा आदेश दोडामार्ग तहसीलदारांनी काढला आहे. मात्र ही मुदत उलटूनही अद्याप एमआयडीसी विभागावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांवर कारवाई करणारा महसूल प्रशासन या विभागावर मुदतीत कारवाई करणार? की केवळ कागदी घोडे नाचवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आडाळी पंचक्रोशी अवैध माती उत्खनन सुरू आहे. या परिसरात सर्रास व दिवसाढवळ्या माती उत्खनन केले जाते. परिसरातील मातीला चांगली ग्रेड असल्यानेे ही माती उत्खनन करून गोव्यातील काही दलालांना हाताशी धरून रेडी येथे पाठविले जात असल्याच्या चर्चा आहे. एरवी कायम सजग राहणारा महसूल विभाग मात्र अशावेळी गांधारीच्या भूमिकेत राहिल्याचे चित्र आहे. कारण महसूलच्या गाव पातळीवरील कर्मचार्याला (तलाठी) असे अवैध माती उत्खनन का दिसत नसावे? की जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते? असे सवाल उपस्थित होत आहेत.
वृत्तपत्रात बातमी लागली की दुसर्या दिवशी हा विभाग कारवाई करतो आणि त्यानंतर परत ये रे माझ्या मागल्या असा कारभार या विभागाचा सुरू होतो, असे बोलले जात आहे. आडाळी एमआयडीसीतील अवैध माती उत्खननावर महसूलने मोठी कारवाई केली. यात तब्बल 1565.64 ब्रास अवैध माती साठा जप्त केला व एमआयडीसी विभागास 56 लाख 36 हजार 304 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सात दिवसांत हा दंड भरण्याचा आदेश तहसीलदार यांनी दिला आहे. मात्र अद्यापपर्यंत हा दंड भरण्यात आला नसल्याची माहिती मिळते. या विभागावर महसूल विभाग इतका मेहेरबान का? असा सवाल उपस्थित होत आहे.
माती उत्खननासाठी स्थानिकांचा जेसीबी वापरला जातो. शिवाय गावात स्थानिक पातळीवर चोरून महसूल बुडवला जात असेल तर त्याची इत्यंभूत माहिती तलाठी, मंडळ अधिकार्यांना मिळते. मात्र आडाळीत हे दोन्ही महसूलचे अधिकारी याला अपवाद आहेत, कारण दिवसाढवळ्या माती उत्खनन होऊनही या अधिकार्यांना काहीच माहिती नसणे म्हणजे नवल म्हणावे लागेल. त्यामुळे या दोन्ही अधिकार्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाचा महसूल बुडवण्यात हे खरच सामील नसावेत का? असा सवालही उपस्थित होत आहे.
युवकांना रोजगार मिळावा यासाठी आडाळी येथे एमआयडीसी उभारण्यात आली. मात्र चांगले उद्योग सोडून नको ते उद्योगांचे प्रताप येथे सुरू झाले आहेत. उद्योग सुरू व्हावेत यासाठी वारंवार आंदोलन करणारे अवैध माती उत्खननावर मात्र चुप्पी बाळगून आहेत. त्यांच्या चुप्पी बाळगण्याचे नेमके कारण काय असावे? हे प्रताप त्यांना माहित नसावेत का? की केवळ राजकीय स्टंट म्हणून ते वारंवार आंदोलन करतात? असे अनेक सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहेत.