

आचरा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचरा ग्रामपंचायतीने नियोजनाला वेग दिला असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबरोबरच वाहतूक आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा, तसेच आचरा तिठ्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांची तैनात करावे असे महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायतीच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आले.
गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, आठवडा बाजार तसेच उत्सव काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी ग्रामपंचायत आचरा यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत सभागृहात संयुक्त बैठक झाली. यावेळी पोलिस प्रशासन, व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, विद्युत मंडळ तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी गणेशोत्सवाच्या उत्साहासोबत पर्यावरणाचे भान राखण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. बाजारपेठेत गणेशोत्सव काळात वाढणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
वीज समस्यांवर अधिकाऱ्यांना खडे बोल
गणेशोत्सव काळात वीजपुरवठा चालू असताना वारंवार व्यत्यय येऊ नये, यासाठी सरपंच फर्नांडिस यांनी उपस्थित विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती पूर्वतयारी करून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
आचरा तिठ्यावर पोलिसांची तैनाती
गणेशोत्सव काळात आचरा तिठ्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी होमगार्डसोबत पोलिसांचीही तैनाती करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फलक अथवा जाहिरात फलक रस्त्यावर लावू नयेत, अशा सूचना व्यापाऱ्यांना देण्याचे ठरले. एसटी बस थांब्याजवळ खासगी वाहने उभी केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत, व्यापारी आणि रिक्षा संघटनेच्या समन्वयातून उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, महेश राणे, पोलिस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, उद्योजक जयप्रकाश परुळेकर, ग्रा. पं. सदस्य पंकज आचरेकर, चंदू कदम, पूर्वा तारी, सायली सारंग, विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता शिंदे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत, मंदार सांबारी, पिंट्या साळकर, मंगेश परब, पोलिस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी, रिक्षा संघटनेचे संजय आचरेकर, श्रीपाद वायंगणकर, मिराशी, भाटकर, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब आदी उपस्थित होते.