दहा वर्षांनी सिंधुदुर्गात पुन्हा सापडला हत्तीरोगाचा रूग्ण

मालवण परिसरातील 1238 रक्त नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेकडे
Elephantiasis microorganisms
मालवण हत्तीरोगाचा फैलावPudhari File Photo

ओरोस : पुढारी वृत्तसेवा

कधी काळी हत्तीरोगाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मालवण तालुक्यात पुन्हा एकदा हत्ती रोग पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यापूर्वी सन 2014 मध्ये जिल्ह्यात हत्तीरोगाचा शेवटचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा हत्तीरोगाचा रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा त्या परिसरातील नागरिकांचे तपासणीसाठी रक्त नमुने गोळा करत आहे. आतापर्यंत 1 हजार 238 रक्त नमुने या तपासणीसाठी गोळा झाले असून पुणे एनव्हीआय प्रयोगशाळेकडे रवाना झाले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत याचा अहवाल प्राप्त होईल. सद्या हत्ती बाधित रुग्ण आरोग्य विभागाच्या निगराणी खाली आहे. तर आरोग्य विभागाची पथके दिवस-रात्र कार्यरत झाली आहेत.

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाची बैठक बोलावली होती. याबाबत आरोग्य विभागाने केलेले सर्वेक्षण, घेतलेले रक्त नमुने याचा आढावा घेऊन हत्ती रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ.संदेश कांबळे या बैठकीला उपस्थित होते.

हत्तीरोगाचा पुन्हा शिरकाव

हत्तीरोग बाधित रुग्णाला क्युलेक्स जातीच्या डासाने चावा घेतला व तो डास इतरांना चावला तर त्याच्या माध्यमातून हत्ती रोग पसरतो. जिल्ह्यात म्हणजे मालवण तालुक्यात 2014 पर्यंत 71 रुग्ण सापडले होते. केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेने त्यावेळी एक चळवळ राबवून या रोगावर पूर्णतः नियंत्रण मिळविले होते. सन 2014 नंतर या जिल्ह्यात एकही रुग्ण सापडला नव्हता. आता हा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे या जिल्ह्यात हत्तीरोगाने पुन्हा शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सर्वेक्षण व औषध उपचाराचे काम विद्या पातळीवर हाती घेण्यात आले आहे. हत्तीरोग बाधित रुग्ण महिला असून तिच्यावर औषधोपचार सुरू असून ती बरी झाल्याचे, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा अ‍ॅक्टिव्ह मोडवर

मालवण नगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी सांडपाणी व तुंबलेले गटारे डासांची माहेरघरे ठरत असून याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. नगरपालिकेला याबाबतच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरिकांनी ही खबरदारी घ्यावी वा डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हा आरोग्य विभागाची आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून जोखीमग्रस्त भागात ही पथके दिवस-रात्र कार्यरत ठेवण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news