

कुडाळ : कुडाळ एसटी आगाराने श्री गणेश चतुर्थी दिवशीच बुधवारी तब्बल 80 बसफेर्या अचानक रद्द केल्या. गौरी गणपती सणानिमित्त जादा प्रवासी वाहतुकीसाठी आगाराच्या बसेस ठाणे येथे गेल्याने तसेच गणेश चतुर्थी दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने कमी भारमान असल्याने या बसफेर्या एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला.
मात्र यामुळे प्रवाशी, गणेशभक्तांची मोठी गैरसोय झाली. कोकण रेल्वेने गावी दाखल चाकरमानी, गणेशभक्तांचे मोठे हाल झाले. मालवण व अन्य भागात जाणार्या चाकरमान्यांसह प्रवाशांना खासगी वाहनांसाठी दामदुप्पट भाडे देत घर गाठावे लागले. आगाराच्या या कार्यपद्धतीबाबत प्रवासी व चाकरमान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरी, पणजी, विजापूर, वेंगुर्ले, मालवण, कणकवली, खारेपाटण कुरंगवणे, देवगड, सिंधुदुर्गनगरी, सावंतवाडी, सरंबळ, बामणादेवी, निवजे, कुसगांव, खवणे, किल्लेनिवती, बांव, हुमरमळा, निळेली बामणादेवी, वायंगवडे, रांगणातुळसुली, आदोसेवाडी, घावनळे, तळगाव, म्हापण, निवती, भोगलेवाडी, परुळे, कवठी, पांग्रड, सोनवडेपार, नारुर वाडोस, हिंदेवाडी हिर्लोक, मोरे गोठोसे तिठा, फुटब्रीज, केरवडे, कोचरा, नेरुर चौपाटी, नारुर, मळई, कर्ली, केळूस, चिपी शाळा, बामणादेवी निवजे देवूळ, भोगवे, कोरजाई, पाट हायस्कूल आदी विविध मार्गावरील बुधवारी 80 बसफेर्या अचानक बंद ठेवण्यात आल्या. पूर्व कल्पना न देता अचानक मंगळवारी रात्री उशिरा सूचना फलक बसस्थानकात लावून बुधवारी या बसेस बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांसह चाकरमान्यांचे हाल झाले.
गणेश चतुर्थी दिवशी गणेशभक्त हार, फुले, फळे, तसेच अन्य साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. रेल्वे गाड्यांना उशिर झाल्याने अनेक चाकरमानीही गणेशोत्सव दिवशी दुपारपर्यंत दाखल होत असतात. बुधवारीही असे शेकडोे चाकरमानी कोकण रेल्वेने कुडाळ रेल्वे स्थानकात दाखल झाले. हे चाकरमानी गावी जाण्यासाठी कुडाळ बसस्थानकात आले, मात्र गावात जाणार्या एसटी फेर्या बंद असल्याने त्यांना नाईलाजास्तव रिक्षा, मॅजिक सारख्या खाजगी वाहनांसाठी दामदुप्पट भाडे देऊन घर गाठावे लागले. तरीही दुपारच्या सत्रात बसस्थानकात अनेक चाकरमानी, प्रवासी ताटकळत होते.
एसटी महामंडळ बंद करण्यासाठी घाट!
थेट प्रवाशांनाच वेठीस धरण्याचे प्रकार अलीकडे सातत्याने होत असून एसटी महामंडळ बंद करण्यासाठी हा सर्व प्रकार होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. याबाबत सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधीही चुप्पी साधून असल्याने सर्वसामान्य जनता व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.