सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात शिकारीसाठी जंगलात ठेवलेले ९ गावठी बॉम्ब हस्तगत, दोघे ताब्यात | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात शिकारीसाठी जंगलात ठेवलेले ९ गावठी बॉम्ब हस्तगत, दोघे ताब्यात

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील एका गावात जंगली प्राणी मारण्यासाठी वापरण्यात येणारे ९ गावठी बॉम्ब कुडाळ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत उशिरा पर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

तालुक्यातील एका गावात दोघे जण शिकारीसाठी जंगलात ठेवलेले गावठी बॉम्ब ठेवत होते. हा प्रकार एका व्यक्तीने पाहिला व पोलीसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात संबंधित दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान तक्रारदार काजू बाग मालक असून त्यांच्या बागेतील काजू चोरीला जात होते. यासाठी काजू बाग मालक यांनी बागेत पहारा ठेवला. यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीला हे दोघे काजू बागे नजिक ईसम त्याठिकाणी संशयास्पद फिरताना दिसले. यावेळी या महिलेने त्यांना हटकले व त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ गावठी बॉम्ब आढळले. ते दोघेही जंगली प्राण्यांना मारण्यासाठी या प्राण्यांच्या मार्गावर हे गावठी बॉम्ब ठेवून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलीसांना माहिती दिल्यावर पोलीसांनी घटनास्थळी जात हे गावठी बॉम्ब जप्त करून दोघांनाही ताब्यात घेतले. हे गावठी बॉम्ब शेतालगत ठेवण्यात येत असल्याने ते मानवी जीवांबरोबरच ईतर प्राण्यांसाठीही धोकादायक आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असुन त्यानुसार आपण कायदेशीर कारवाई कुडाळ पोलिस स्टेशन मार्फत करण्यात येईल अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी दिली आहे.

Back to top button