सिंधुदुर्ग : साडवली येथे कारच्या धडकेत सायकलस्वार तरूणाचा जागीच मृत्यू | पुढारी

सिंधुदुर्ग : साडवली येथे कारच्या धडकेत सायकलस्वार तरूणाचा जागीच मृत्यू

साडवली; पुढारी वृत्तसेवा : देवरूख-संंगमेश्वर मार्गावरील साडवली येथे एका सायकलस्वाराला फॉर्च्यूनर कारची पाठीमागून जोराची धडक बसल्याने सायकलस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. शोभीत अनंत जाधव (वय-२२, रा. निगुडवाडी. ता. संंगमेश्वर) असे अपघातात मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शोभीत जाधव हा देवरूख- संंगमेश्वर मार्गावरून देवरूखहून साडवलीच्या दिशेने सायकलवरून जात होता. याचवेळी देवरूखहून संगमेश्वरच्या दिशेने जात असलेल्या फॉर्च्यूनर गाडीने सायकलस्वार शोभीतला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत सायकलस्वार शोभीत याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी देवरूख परिसरात पसरताच सर्वांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.

सकाळी घरातून कामाला निघालेल्या शोभीतच्या अपघाताची बातमी निगुडवाडीत समजताच त्याचे आई-वडील व नातेवाईक देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. मात्र शोभीतचा मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. शोभीतचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर निगुडवाडीतील ग्रामस्थांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. तर शोभीतच्या अपघाताची बातमी समजताच बेलारी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही देवरूख ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, देवरुख पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक डी. एस. पवार, हे. काँ राहुल गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. देवरुख पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. शोभीतच्या अपघाती मृत्यूने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Back to top button