तिलारी घाटात तीव्र उतारावर ट्रक अडकला; वाहतूक ७ तास ठप्प | पुढारी

तिलारी घाटात तीव्र उतारावर ट्रक अडकला; वाहतूक ७ तास ठप्प

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा तिलारी घाटातील तीव्र उताराच्या वळणाचा अंदाज न आल्याने माल वाहतूक करणारा एक चौदा चाकी ट्रक अडकून पडल्याची घटना आज (शनिवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या ट्रकमुळे संपूर्ण रस्ताच व्यापला गेल्याने घाटातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली‌ आहे‌. दुचाकी, एसटी बस सहीत सर्व खासगी वाहनांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. दोन क्रेनच्या साह्याने तब्बल सात तासानंतर ट्रक बाजूला करण्यात आला व वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

आंध्रप्रदेश येथील माल वाहतूक करणारा एक चौदा चाकी ट्रक तिलारी घाटमार्गे गोव्याला जात होता. शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तिलारी घाट उतरत असताना पहिल्याच तीव्र उताराच्या यु वळणाचा अंदाज ट्रक चालकास आला नाही. वळण घेण्यास आपण अपयशी ठरत असल्याचे लक्षात येताच चालकाने ब्रेक लावला. त्यानंतर ट्रक काहीसा मागे घेऊन पुन्हा पुढे घेऊ यासाठी चालकाने रिव्हर्स गिअर घातला व ट्रक मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक मधील अवजड सामानामुळे व चढावामुळे ट्रक मागे जात नव्हता. अखेर चालकाचे प्रयत्न हरले व ट्रक रस्त्यातच उभा ठेवण्यावाचून अन्य पर्याय चालकाकडे शिल्लक नव्हता.

ट्रक भर रस्त्यातच उभा राहिल्याने याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. घाटातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. दुचाकी वाहनांना देखील ये-जा करण्यास जागा नव्हती. परिणामी दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शिवाय कोल्हापूर, बेळगाव येथून दोडामार्गच्या दिशेने येणाऱ्या व दोडामार्गहून बेळगाव आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसेस देखील वाहतूक कोंडीमुळे अडकून राहिल्या. बसमधील प्रवाशांसह, इतर खासगी गाड्यांचे वाहन चालक व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. घाटातील वाहतूक कोंडीमुळे वाहनांची संख्या वाढतच चालली.

वाहतूक वळवली अन्य पर्यायी मार्गाने

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घाटात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही बाजूच्या वाहन चालकांना अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याबाबत सूचविले. यावेळी दोडामार्गहून बेळगाव दिशेने जाणाऱ्या व बेळगावहून दोडामार्गच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांनी मांगेली मार्गे व चोर्ला मार्गे वाहने नेली. तर कोल्हापूरला जाणाऱ्या व कोल्हापूरहून येणाऱ्या वाहन चालकांनी आंबोली मार्गे वाहने नेली. एसटी बस देखील याच मार्गे वळवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे अधिकच हाल झाले. तसेच वीकेंडला गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या दक्षिण भारतातील पर्यटकांची संख्या मोठी असते. हे पर्यटक गुगल मॅपचा सहारा घेत तिलारी घाट मार्गेच गोव्याला जातात. सकाळी घडलेल्या घटनेमुळे वाहतूक वळवावी लागल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची देखील चांगलीच धांदल उडाली.

ट्रक चालकाने गोव्याला जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला. यावेळी त्याला जवळचा मार्ग म्हणून तिलारी घाटमार्गे रस्ता मॅपवर दिसला. त्यामुळे त्याने या घाटमार्गाचा अवलंब केला. मात्र तिलारी घाटातील तीव्र उतार व यु वळणाबाबत अजिबात माहिती नसल्याने ही घटना घडली. त्यानंतर दोन क्रेनला पाचारण करण्यात आले. या क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करण्यात आला व वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

हेही वाचा : 

Back to top button