सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी ते मालवण परिसरात अवतरणार फिल्मसिटी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी ते मालवण परिसरात अवतरणार फिल्मसिटी

मालवण; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी ते मालवण या परिसरात फिल्मसिटी बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी निश्चितच शासनाच्यावतीने सहकार्य मिळेल. सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासित केले आहे. मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन सिने कलावंत तथा सिंधुरत्न कलावंत मंच अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी यनिमित्ताने केले.

मालवण नगरपरिषद नुतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील अनेक नामवंत सिने कलावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मालवण नगरपरिषदेतर्फे अत्याधुनिक कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जेसीबी या वाहनाचे लोकार्पण अभिनेता संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मालवण नगरपरिषद सभागृहाच्या नूतन फलकाचे व सभागृहचे अनावरण अभिनेत्री नूतन जैन व अन्य कलाकार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी सिने नाट्य कलावंत विजय पाटकर, दिगंबर नाईक, सुहास परांजपे, हेमलता बाणे, प्रथमेश परब, नूतन जैन, अभिजीत चव्हाण, आरती सोळंकी, पंढरीनाथ कांबळे, विजय राणे, वेतोबा फेम उमाकांत पाटील, मीरा जोशी, अस्मिता देशमुख, तन्मय पटेकर, संचित चौधरी, आनंदा कारेकर, सुचित जाधव, शुभकर तावडे, संतोष पवार, ज्योती शिंदे अशी सिने तारकांची मांदियाळी होती.

नगरपरिषदेतर्फे मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे यांनी प्रमुख अतिथी अभिनेते विजय पाटकर यांचे स्वागत केले. यानंतर कलावंतांचा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी सुधाकर पाटकर, सोनाली हळदणकर, निखील नाईक, आनंद म्हापणकर, कुलकर्णी, करुणा गांवकर, बस्त्याव फर्नांडिस, निखिल नाईक व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सभागृहाच्या इंटिरीअर डेकोरेटर शिवानी बाबरेकर यांचाही विशेष सत्कार संपन्न झाला. निखील नाईक यांनी प्रास्ताविक केले.

आम्ही कोकणी आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. मालवणमध्ये येऊन माशाची कढी आणि मासे खाण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. येथील रसिक आमच्यावर दाखवत असलेले प्रेम आमच्यासाठी लाखमोलाचे आहेत. यामुळे आज आलो आणि पुन्हा बोलावलात तर पुन्हा येण्यासाठी तयार असू मालवण नगरपालिकेची इमारत आणि त्याची बनविण्यात आलेले अंतर्गत सजावट याबाबत अभिजीत चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला.

कोकणात कलाकारांची खाण आहे. यामुळे याठिकाणी होणाऱ्या महोत्सव व कार्यक्रमांसाठी कोकणातील कलाकारांना प्राधान्याने निमंत्रीत केले गेले पाहिजे. आम्ही भुमीपुत्र असून आम्ही कधीही याठिकाणी येण्यासाठी तयार असतो. आज अनेक भुमीपुत्र मराठी सिनेसृष्टीत आपले नाव करत आहेत. त्यांना अधिक बळ देण्यासाठी कोकणातूनच अधिक प्रयत्न केले गेले पाहिजे, असे दिगंबर नाईक म्हणाले. यानंतर अभिनेते दिगंबर नाईक यांनी विशेष गाऱ्हाणे सादर केले.

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची सांगा कसं जगायचं ही कविता सादर करत उपस्थितांची मने जिकंली. सर्वांचे आभार मानले व हा शासकीय सोहळा इतक्या ग्लॅमरस पद्धतीने शक्य झाला याबद्दल विशेष प्रशंसा केली. सूत्रसंचालन निखील नाईक यांनी सर्वांचे आभार मानले व शतकपूर्ती केलेल्या मालवण नगरपरिषदेच्या नुतनीकरण सभागृह उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

मालवणचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे अभिनंदन समस्त मालवणकरांच्या उपस्थितीत करणे क्रमप्राप्त आहे. त्यांनी शहर विकास सोबत नौसेना दिन आणि कोकण चित्रपट महोत्सवामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. मामा वरेरकर नाट्यगृहाचे रूपच पालटून टाकले. नामवंत कलाकारांचे स्वागत होण्यासाठी आपले नाट्यगृहही दर्जेदार असावे या उद्देशानेच मुख्याधिकारी यांनी मेहनत घेतली. पालिकेचे सभागृहही पाहून आनंद झाला. याठिकाणी येण्यासाठी आम्हाला निमंत्रीत केल्याने आनंद वाटला. असे विजय पाटकर यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news