

कणकवली : वरवडे-फणसनगर येथील चर्चमध्ये शुक्रवारी(दि.18) दुपारी गुडफ्रायडेचा कार्यक्रम होता. तत्पूर्वी दुपारी 2 वाजताच्या सुमारास फणसनगर येथील क्रॉसकडून ख्रिस्ती बांधव प्रार्थना करत चर्चकडे जात असताना नजीक असलेल्या एका इमारतीवरील मधमाशांच्या पोळ्याला अचानक कबुतराचा धक्का बसला आणि पोळ्यातील मधमाशा उठून त्यांनी ख्रिस्ती बांधवांवर हल्ला केला. त्यात सुमारे 60 ते 65 जणांना माशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यात 7 ते 8 लहान मुले होती. जखमींपैकी एका 70 वर्षीय वृद्धाला आणि एका महिलेला गंभीर इजा झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय आणि वरवडे चर्च येथे उपचार करून घरी पाठवण्यात आले.
शुक्रवारी दुपारी वरवडे-फणसनगर येथील चर्चमध्ये गुडफ्रायडे निमित्त प्रार्थना करण्यासाठी वरवडेबरोबरच घोणसरी, साकेडी, फोंडा, कळसुली, आंब्रड, कसवण, तळवडे, कणकवली आदी भागातील ख्रिस्ती बांधव एकत्र आले होते. चर्चमधील कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी तेथून जवळच असलेल्या क्रॉसकडून या बांधवांची प्रार्थना फेरी सुरू झाली. त्यावेळी एका इमारतीवरील मधमाशांच्या पोळ्याला अचानक कबुतराचा धक्का बसला आणि पोळ्यातील मधमाशा उठून त्यांनी ख्रिस्ती बांधवांवर हल्ला केला. अचानकपणे झालेल्या या मधमाशांच्या हल्ल्याने सर्वांचीच पळापळ झाली. प्रार्थनेसाठी सुमारे 200-250 ख्रिस्ती बांधव जात होते. त्यातील सुमारे 60-65 जणांना मधमाशांनी चावा घेतला. सुदैवाने गंभीररित्या कोणाला त्रास झाला नाही. चावा घेतलेल्या ख्रिस्ती बांधवांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांनी आणि काही स्थानिक गाड्यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर डॉ. पंकज पाटील, डॉ. अक्षय पाटील, डॉ. अजय शृंगारे, डॉ. सुजिता मंचिकलपुडी, डॉ. चंद्रतेज यांच्यासहीत प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकार्यांनी उपचार केले.