

काशीराम गायकवाड
कुडाळ : गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा आणि विशेष सण. या सणात नवनवीन उपक्रम व परंपरा पाहायला मिळतात. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्याच्या नेरूर-वाघचौडी येथील गावडे कुटुंबीयांनी गेल्या कित्येक पिढ्यांपासून गणरायासाठी जोपासलेली परंपरा यावर्षी एका नव्या शिखरावर पोहोचली. गावडे घराण्याच्या गणपती पूजन कार्यक्रमात, घराण्यातील 52 कुटुंबे मिळून 52 परंपरागत चुलींवर एकाच वेळी नैवेद्य तयार करण्याची परंपरा गावडे कुटुंबीय जोपासत आहेत. या विश्वविक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंदवली आहे. याबाबतचे प्रमाणपत्र ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’ने दिले आहे. त्यामुळे गावडे घराण्याच्या महाराजाचा अनोखा जागतिक विक्रम झाला आहे.
नेरूर-वाघचौडी येथील 52 कुटुंबांचा एकत्रित श्रीगणेश ‘गावडे कुटुंबाचा महाराजा’ म्हणून ओळखला जातो. या गणेशोत्सवात गावडे कुटुंबीय आजही एक अद्वितीय परंपरा जोपासत आहेत. गावडे घराण्यातील 52 कुटुंबे या गणेशोत्सवासाठी एकत्र येतात.
या गणरायाचा नैवेद्य तयार करण्यासाठी 52 पारंपरिक चुली उभारल्या जातात व या चुलींवर गणरायाचा नैवेद्य शिजवून तो 52 केळीच्या पानांवर श्री गणपती बाप्पाला दाखवला जातो. पेटलेल्या लाकडांच्या अग्नीवर शिजवलेला हा नैवेद्य पारंपरिकता, शुद्धता आणि श्रद्धेचे द्योतक आहे. ही अनोखी परंपरा केवळ घराण्याच्या नव्हे, तर जगभरात क्वचितच पाहायला मिळणारी आहे, ज्यात श्रद्धा, सातत्य, शाश्वतता आणि कौटुंबिक एकतेचे अनोखे दर्शन घडते. गावडे कुटुंबीयांनी 29 ऑगस्ट रोजी येथे हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
गावडे घराण्याचा हा उपक्रम म्हणजे केवळ परंपरेचे जतन नव्हे, तर तो श्रद्धा, एकोपा आणि शाश्वततेचा जागतिक संदेश आहे. आजच्या युगात इतक्या मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने नैवेद्याची तयारी करणे हे खरोखरच अनोखे आहे. या विश्वविक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंदवली आहे.
सुषमा नार्वेकर, चीफ एडिटर - वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया