विहिरीत आढळले ४२ 'पाणघोणस' साप

Sindhudurg News | नेमळे गावात खळबळ; सर्व सापांचा यशस्वी रेस्क्यू
विहिरीत आढळले ४२ 'पाणघोणस' साप
Published on
Updated on

मळगाव : नेमळे-फौजदारवाडी येथे विहिरीचे काम सुरू असताना सापांचा मोठा घोळका सापडल्याने एकच खळबळ उडाली. येथील सर्पमित्र ओंकार गावडे यांनी आपले कसब पणाला लावत तब्बल ४२ 'पाणघोणस' जातीच्या सापांना सुरक्षित बाहेर काढून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे संपूर्ण कौतुक होत आहे.

नेमळे-फौजदारवाडी येथील शेतकरी सखाराम गावडे यांच्या विहिरीचे बांधकाम सध्या सुरू आहे. हे काम सुरू असताना विहिरीच्या रचलेल्या दगडांच्या फटीमध्ये सापांचा वावर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ सर्पमित्र आणि वनविभाग जलद कृती दलाचे सदस्य ओंकार गावडे यांना पाचारण केले. ओंकार यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, तिथे एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने साप असल्याचे दिसून आले. हे सर्व साप बिनविषारी वर्गातील 'पाणघोणस' जातीचे असल्याचे स्पष्ट झाले.

विहिरीतील दगडांच्या आडोशाने बसलेल्या या सापांना ओंकार यांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढले. यावेळी सापांच्या मादीने विहिरीतील पाण्यात उडी घेतल्याने तिला तिथेच राहू देण्यात आले. मात्र, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हामुळे दगडांमधील उष्णता प्रचंड वाढली होती. अशा स्थितीत सापांच्या ४२ पिल्लांना तिथे ठेवणे त्यांच्या जीवासाठी धोक्याचे होते. त्यामुळे या सर्व पिल्लांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पाण्याजवळ असलेल्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news