

कुडाळ : वडिलांनी गाडी घेऊन दिली नाही, या कारणावरून कुडाळ येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० ते ११.३० वा. या कालावधीत घडली. युवराज विजय परब (वय १६) असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
युवराज परब हा वडिलांसोबत कुडाळ येथील मेहनील प्लाझा इमारतीत भाड्याने राहत होता. त्याचे मूळ गाव कणकवली तालुक्यातील शिरवल हे आहे. शिक्षणासाठी तो मामाच्या गावी निरूखे येथे राहत होता. तेथील पांग्रड हायस्कूलमध्ये तो इ. १० वीत शिकत होता. अधूनमधून तो कुडाळ येथील घरी येऊन- जाऊन असायचा. त्याचा भाऊही निरूखे येथे शिक्षणासाठी मामाकडे राहत आहे.
दरम्यान, युवराज याने काही दिवसांपूर्वी वडिलांकडे दुचाकीची मागणी केली होती. मात्र, तू अल्पवयीन असून तुझे यंदा १० वीचे वर्ष आहे. १० वी उत्तीर्ण झाल्यावर गाडीचे बघू, असे वडिलांनी त्याला सांगितले होते. दुचाकीस वडिलांकडून नकार मिळाल्याने तो नाराज होता. याच नाराजीतून त्याने २९ ऑक्टोबर रोजी रात्री राहत्या घरातील बेडरूममध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.
रात्री ११.३० वा. बेडरूममधील वस्तूसाठी दरवाजा ठोठावला असता युवराजकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे वडील व शेजारील नागरिकांनी बेडरूमचा दरवाजा तोडला असता युवराज हा पंख्याला ओढणी अडकवून गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्याला तातडीने खाली उतरवत कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी त्याचे वडील विजय विद्याधर परब (३९) यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी त्याच्यावर मूळ शिरवल गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस हवालदार महेश भोई हे पुढील तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, क्षणिक रागातून घेतलेला टोकाचा निर्णय एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवणारा ठरला आहे.