कुडाळ विधानसभेसाठी 11 उमेदवारी अर्ज ; आज छाननी!

Maharashtra assembly poll|वैभव नाईक यांचे 3 तर नीलेश राणेंनी भरले 2 अर्ज ; मुंबईस्थित आणखी एका वैभव नाईकांनी भरला अर्ज
maharashtra assembly election
कुडाळ विधानसभेसाठी 11 उमेदवारी अर्ज ; आज छाननी!file photo
Published on
Updated on

कुडाळ :कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी, महायुती, बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, रासप या पक्षांसह अपक्ष मिळून एकूण 8 उमेदवारांनी 11 उमेदवारी अर्ज कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे दाखल केले आहेत.

महाविकास आघाडीकडून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव विजय नाईक यांनी 3 तर महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे नीलेश नारायण राणे यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित उमेदवारांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे ‘मविआ’चे उमेदवार वैभव नाईक यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या मुंबईस्थित वैभव जयराम नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बुधवार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी वा. या वेळात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.

269-कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 25 अर्जांची विक्री झाली होती. पैकी 8 उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत आपले 11 अर्ज सादर केले. तर 14 अर्ज सादरच झाले नाहीत.

महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा पक्षाचे विद्यमान आमदार वैभव विजय नाईक (रा. बिजलीनगर कणकवली) - 3, महायुतीकडून शिवसेनेचे नीलेश नारायण राणे (रा.वरवडे, कणकवली) - 2, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अनंतराज नंदकिशोर पाटकर (रा.हुमरमळा अणाव) - 1, बहुजन समाजवादी पार्टीकडून रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (रा.कसाल)-1, रासपकडून उज्वला विजय येळाविकर (रा. उद्यमनगर कुडाळ)-1, अपक्ष सौ. स्नेहा वैभव नाईक (रा. बिजलीनगर कणकवली)-1, अपक्ष वैभव जयराम नाईक (रा.पवई, कुर्ला, मुंबई उपनगर) - 1, अपक्ष प्रशांत नामदेव सावंत (किर्लोस- गावठाण ता.मालवण)-1 यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.(Maharashtra assembly poll)

आ.नाईकांच्या पत्नीने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज !

कुडाळ विधानसभा मतदारसंघात उबाठा पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेविका श्रुती वर्दम, श्रेया गवंडे उपस्थित होत्या. तसेच वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती.

लोकसभेसाठीही होते दोन विनायक राऊत रिंगणात

दोन वैभव नाईकांप्रमाणे गेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन विनायक राऊतांची चर्चा होती. त्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांच्यासह विनायक लवू राऊत या नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्या पाठोपाठ त्यांना तिसर्‍या क्रमांकाचे मतदान त्यांना झाले होते. त्यांना त्या निवडणुकीत 15 हजार 826 मते अपक्ष विनायक लवू राऊत यांना मिळाली होती आणि ही टक्केवारी एकूण मतदानाच्या 1.73 एवढी होती. यावेळी देखील वैभव नाईक यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या या मुंबईच्या वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे नेमका कोणाला फायदा आणि तोटा होणार? हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.(Maharashtra assembly poll)

अजून एक वैभव नाईक रिंगणात !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभव नाईक यांनी कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी अजून एका मुंबईस्थित वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले वैभव जयराम नाईक हे मुंबई -पवई चैतन्यनगरयेथील रहिवासी आहेत. त्यांचा अर्ज सागर सोलकर यांनी खरेदी केल्याची नोंद असून त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यांच्या समवेत भाजपचे माजी पं. स. सदस्य संदेश नाईक, नगरसेवक अ‍ॅड. राजीव कुडाळकर उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news