सिंधुदूर्ग : ‘आंबा कॅनिंग’मधून 10 कोटीची उलाढाल; शेतकर्‍यांना 10 ते 15 टक्के नफा

सिंधुदूर्ग : ‘आंबा कॅनिंग’मधून 10 कोटीची उलाढाल; शेतकर्‍यांना 10 ते 15 टक्के नफा

सचिन लळीत, विजयदुर्ग : बदलत्या हवामानाचा आंबा व्यवसायावर परिणाम होत असल्याने आंबा व्यवसायाचे चित्र बदलत चालले आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात आंबा असूनही फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे व मार्केटमध्ये दर गडगडल्याने बागायतदारांचा कॅनिंगला आंबा देण्यात मोठ्या प्रमाणात कल असून कॅनिंग व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातून दरवर्षी 50 हजार टन आंबा कॅनिंगला जात असून 10 कोटींची उलाढाल या व्यवसायातून होत आहे. शेतकर्‍यांना 10 ते 15 टक्के नफा या व्यवसायातून होत असल्याचे देवगडमधील प्रमुख कॅनिंग व्यापारी मंगेश वेतकर यांनी सांगितले.

पूर्वी गुढीपाडव्याला आंबा व्यवसायाला सुरूवात व्हायची व पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा विक्री वाशी मार्केट येथे केली जायची. आता निसर्गाच्या बदलत्या चित्रानुसार फेब्रुवारीपासूनच आंबा काढणी काही प्रमाणात सुरू होते. तर मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने आंबा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कोकणातील बहुतांशी आंबा हा  वाशी मार्केट येथे विक्रीसाठी जातो. साधारण  मे अखेरीस  आंबा कॅनिगला सुरूवात होते. यावर्षी एप्रिल महिन्यातच या व्यवसायाला सुरूवात झाली असून देवगड तालुक्यात वेतकर यांच्या पडेल येथील कॅनिंग सेंटरवरूनच दिवसाला 10 ते 12 ट्रक कॅनिंगला आंबा घेवून जात आहे. यावरून कॅनिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र आहे.

दरवर्षी बदलत्या हवामानानुसार या व्यवसायात देखील बदल होत आहे. मे महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणारा कॅनिंग व्यवसाय गेले काही वर्ष मार्च, एप्रिल या महिन्यातच सुरू होत आहे. यावर्षी एप्रिल अखेरीस कॅनिग व्यवसायाला सुरूवात झाली. मोठ्या प्रमाणात वाढलेली आंब्याची आवक यामुळे मुंबई येथील वाशी मार्केट येथील दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यात वाढलेला उष्मा, मधल्या काळात झालेला पाऊस, फळमाशीचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने व्यापारी वर्गदेखील हैराण झाला आहे. यामुळे आंबा तोडणी मोठ्या प्रमाणात वाढली असून कॅनिंगला आंबा देण्यास सुरूवात झाली आहे.

पडेल येथील प्रसिद्ध आंबा कॅनिंग व्यापारी मंगेश वेतकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या कॅनिंगचा दर हा 30 रूपये असून काही दिवसाच्या फरकाने हे दर कमी जास्त होत असतात. सध्या मोठ्या प्रमाणात आंबा कॅनिंगला येत असून दिवसाला आंब्याची आवक वाढत चालली आहे. हवामानात वाढलेला मोठ्या प्रमाणात उष्णता यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. यामुळे आंबा तोडणी सर्वत्र जोरदार होत असून कॅनिंगला मोठ्या प्रमाणात आंबा येत आहे.

पडेल येथील रामेश्वर कॅनिंग सेंटरमध्ये आंब्याची मोठी आवक 

सध्या पडेल येथील रामेश्वर कॅनिंग सेंटर येथून कॅनिंगचे दहा ते बारा ट्रक हे भरत असून मोठ्या प्रमाणात आंबा पावस, नाशिक, बलसाड, जळगाव या भागात जात आहे. रोजचा तीस टनाहून अधिक आंबा येथून बाहेर जातो. यामुळे या भागात कॅनिंग व्यवसायात छोटे मोठे अनेक व्यापारी उतरले आहेत. देवगड तालुक्यातील पडेल येथे रामेश्वर कॅनिंग सेंटर येथे आंबा कॅनिंग व्यवयास मोठ्या प्रमाणात चालत असून यासाठी जादा प्रमाणात कामगार वर्ग पडेल येथे कामास लागला आहे.

फळमाशी व उष्मा याचा आंबा व्यवसायावर परिणाम 

यावर्षी फळमाशीचा त्रास मोठ्या प्रमाणात आंब्याला होत असल्याने आंबा किडण्याचे प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर वाढती उष्णता यामुळे आंबा लासा होत असून झाडावर आंबा मोठ्या प्रमाणावर पिकत आहे. यामुळे अनेक बागायतींमध्ये आंबा पडून जात आहे. कॅनिंगसाठी लहान-मोठे सर्वच फळ चालत असल्याने मागील आंबा न ठेवता तो तोडून कॅनिंगला दिला जात आहे. पावसाच्या भीतीपोटी अनेक व्यापारी आंबा बागा रिकाम्या करू लागले आहेत.

कामगार वर्गाचा तुटवडा 

आंबा तोडणी, आंबा वाहतूक करणे, आंबा भरणे यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग लागतो. सध्या सर्वत्र कामगार वर्गाचा तुटवडा भासत आहे. कॅनिंग व्यवसायासाठी देखील रत्नागिरी जिल्ह्यातील कामगार मोठ्या प्रमाणात कामासाठी आणण्यात आले आहेत. मे महिन्यात लग्नसराईंचे दिवस असल्याने कामगार वर्ग कमी पडत आहे. यामुळे कामगार नसल्याने अनेक व्यापार्‍यांचा आंबा तोडणी वेळेवर होत नसल्याने आंबा फुकट जात आहे.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील माऊली रथ नेते गरजूंपर्यंत जेवण

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news