दोडामार्ग/देवगड/सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा :
गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वार्यांसह पाऊस होत असल्याने घरे-गोठ्यांसह अनेक मालमत्तांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच आंबा, काजू, कोकम, केळी बागायतींनाही याचा फटका बसला असून वीज वाहिन्या तुटल्याने जिल्ह्यातील अनेक गावे काळोखात बुडाली आहेत. बुधवारी तर दोडामार्ग तालुक्यात गारपिटीसह धुवाँधार पाऊस कोसळला. यामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून, झाडे पडल्याने अनेक मार्गही ठप्प झाले आहेत. अवकाळी पावसाने जिल्ह्यात अक्षरशः धुडगूस घातला आहे.
दोडामार्ग तालुक्याला बुधवारी सायंकाळी पुन्हा वादळी वार्यासह झालेल्या जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. काही भागांत गारांचा पाऊस पडला. शिवाय काही भागांत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. तळकट येथील संभाजी यशवंत गवस यांच्या घरावर माडाचे झाड पडल्याने त्यांचे
आर्थिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. अवकाळी पावसाने तालुक्यात अक्षरशः हाहाःकार माजविला.
सोमवारपासून दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळी 6 वा.च्या सुमारास पाऊस पडला. मंगळवारी रात्री 8:30 वा. च्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी सकाळपासूनच ढग दाटून आले होते. दुपारी 3 वा. च्या सुमारास जोरदार वारा सुटला. त्यानंतर मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात तर गारांचा पाऊस झाला. तिलारी परिसर तसेच साटेली-भेडशी यांसह काही भागात गारा कोसळल्या. सोसाट्याच्या वार्यामुळे कळणे, तळकट-पडवे, मेढे येथे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतूक ठप्प झाली. दोडामार्ग-वीजघर राज्य मार्गावर मेढे येथील गेल कंपनीजवळ मोठे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
देवगड तालुक्यात अनेक ठिकाणी आंबा कलमे उन्मळून पडली. तर किंजवडे येथे चार घरांची छप्परे उडून भिंती कोसळल्या आहेत. कुडाळ तालुक्यातील कुंदे गावाला चक्रीवादळसदृश्य पावसाचा तडाखा बसला. गावातील घरांची छप्परे तब्बल 100 फूट लांब उडाल्याने येथील वादळाची तीव्रता लक्षात येते. मालवण तालुक्यातील 15 घरांचे नुकसान झाले. सावंतवाडी शहरात झाडे कोसळल्याने शहर अंधारात बुडाले. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-बागायतवाडी येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले. डिंगणे-आंबेडकरनगर येथील एका घरावर वीज कोसळल्याने भिंतीचे नुकसान झाले. सुदैवाने कुटुंब मात्र बचावले. कळणे खाणीतील पाणी रस्त्यावर आल्याने बांदा-दोडामार्ग राज्यमार्ग चिखलमय बनला. सावंतवाडी तालुक्यातील मडुरे, सातार्डा परिसरातील उन्हाळी शेतीलाही या पावसाचा जबर तडाखा बसला. वादळी पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व खांब जमिनदोस्त झाले असून अनेक गावे बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत काळोखात बुडाली होती. अजून दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामुळे शेतकरी व नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.