

दुकानवाड; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात शनिवार पासून सुरू असलेल्या पावसाचा मध्यरात्रीपासून जोर वाढला. माणगांव खोर्याला मुसळधार पावसाने रविवारी अक्षरशः झोडपून काढले. आंबेरी पुलावर पाणी आल्याने 25 गावांचा संपर्क तुटला. शिवाय दुकानवाड, उपवडे व परिसरातील पुल दिवसभर पाण्याखाली होता. सावंतवाडी व कुडाळ आगाराच्या एसटी बसेसह अन्य खासगी वाहने सकाळपासून या परिसरात अडकून होती. सखल भागातील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली होती. परिणामी नागरीकांची प्रचंड गैरसोय झाली. सायंकाळी उशिरापर्यंत माणगांव खोर्यात पावसाचा जोर कायम होता.
कुडाळ तालुक्यात गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी दुपारनंतर सर्वत्र पावसाने जोर धरला. अकरा दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर कुडाळ शहरासह ग्रामीण भागात पावसाने कहर केला. रात्रभर धो धो कोसळणा-या पावसाने रविवारी पहाटेपासूनच तालुक्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. सर्व नदी, नाले दिवसभर दुथडी भरून वाहत होती. सह्याद्री पट्ट्यातील माणगांव खोर्यात ढगफुटी सदृश पाऊस कोसळला.
या पावसाने निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी येथील पूलावर पाणी आले. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. दोन्ही बाजूंना वाहतूक खोळंबली होती. पाणी ओसरताच वाहतूक सुरू झाली. मात्र दुकानवाड, उपवडे व परिसरातील सखल भागातील सर्व पुलांवर पुराचे पाणी आल्याने या भागातील वाहतूक दिवसभर ठप्प होती. दुकानवाड व उपवडे येथील दोन्ही पुल दिवसभर पाण्याखाली होते. त्यामुळेच दोन्ही बाजूंना वाहतूक खोळंबली होती. दुकानवाड पुलावर कुडाळ व सावंतवाडीला जाणा-या एसटी बसेसह अन्य वाहने अडकली होती. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांचे हाल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर कायम होता. वाहतूक व्यवस्थेसह वीज, दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली. भातशेतीतही पाणी साचले होते.
हेही वाचा