

रत्नागिरी : राज्यातील विविध विद्यापीठात प्रवेशाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता युवा महोत्सवाचे वेध लागले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो.
मुंबई विद्यापीठासह कोल्हापूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजी नगर विद्यापीठाच्या वतीने युवा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू करीत आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठातर्फे 58 युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी 21 ऑगस्टला भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात रंगणार आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर या चार तालुक्यांचा समावेश आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाने विविध कलाप्रकारांची तयारी करीत आघाडी घेतली आहे.
दक्षिण रत्नागिरीतील 20 महाविद्यालयातील 1500 हून अधिक विद्यार्थी प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. या फेरीत लोकनृत्य, नृत्य, गायन, वादन, एकांकिका, लघ्ाुनाटिका, मूकनाट्यसह, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व अशा 38 कलाप्रकारांचे कलाकार सादरीकरण करणार आहेत. त्यासाठी या 17 महाविद्यालयाकडून जोरदार सराव सुरू आहे. शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाकडून कसून सराव सुरू आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध कलाप्रकारांची तयारी सुरू असून काही महाविद्यालयात सर्व कलाप्रकार बसवून झाले असून सराव सुरू आहे. अंतिम फेरी 8 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबरदरम्यान मुंबई विद्यापीठात होणार आहे. विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी येणार्या सर्व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशी माहिती प्रभारी प्राचार्य मधुरा पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.ऋतुजा भोवड, रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी दिली.
दक्षिण विभाग सहसमन्यवयक प्रा. तारांचद ढोबळे मार्गदर्शन करीत आहेत. सोलापूर विद्यापीठ वगळता राज्यातील शिवाजी विद्यापीठ,पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बामू विद्यापीठ,नांदेड विद्यापीठात सुरुवातीला प्राथमिक फेरी होते त्यानंतर अंतिम फेरी होत असते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा युवा महोत्सव सप्टेंबर महिन्यात होणार असून 9 ते 13 प्राथमिक फेरी, मध्यवर्ती फेरी 18 ते 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, नांदेड विद्यापीठाचे महोत्सव सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होणार असून सर्वच विद्यापीठातर्फेजय्यत तयारी सुरू आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ एका जिल्ह्यासाठी विद्यापीठ असल्यामुळे त्यांचा युवा महोत्सव स्वतंत्र होत असतो. 110 महाविद्यालयापैकी तब्बल 65 महाविद्यालयातील 2 हजारांहुन अधिक विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतात. चार दिवस चालणार्या महोत्सवात तब्बल 30 हुनअधिक कलाप्रकार सादर करीत असतात. मोठ्या चुरशीने स्पर्धा होत असते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख केदारनाथ काळवणे हे युवा महोत्सवाचे नियोजन करीत असून सप्टेंबर शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महोत्सव घेण्यासाठी तयारी करीत आहेत.
- मुंबई विद्यापीठ-प्राथमिक फेरी 21 ऑगस्ट,अंतिम 8 ते 11 ऑक्टोबर
- शिवाजी विद्यापीठ - 9 ते 13 सप्टेंबर प्राथमिक फेरी, मध्यवर्ती-18 ते 20 सप्टेंबर
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ सप्टेंबर महिन्यात प्राथमिक फेरी
- पुणे विद्यापीठ- सप्टेंबरच्य दुसर्या आठवड्यात होणार आहे.
- सोलापूर विद्यापीठ-सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात