

कुडाळ : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून सध्या लघुपाटबंधारे व साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात येणार आहे. यासाठी कोकणाला स्वतंत्र पॅकेज मिळावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. नीलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, दादा साईल, उपस्थित होते. ना. कदम म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक साकव पावसाळ्यात पाण्याखाली जातात, परिणामी गावांचा संपर्क तुटतो. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी विशेष साकव कार्यक्रमांतर्गत सर्व साकवांचे रूपांतर मोठ्या पुलांमध्ये करण्याचा आराखडा तयार होत आहे. ग्रामविकास विभागाकडून यासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर केले जाईल.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आ. नीलेश राणे म्हणाले, टाळंबा प्रकल्पासाठी लोकांची तयारी महत्त्वाची आहे. सरकार आपलंच आहे. पण प्रकल्प हाणामारी करून राबवायचा नाही. लोकांनी या प्रकल्पाला सहमती दर्शवली तर प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आणि प्रकल्प नको म्हणून भूमिका घेतली तर तशी भूमिका घेतली जाणार आहे. पण आधी आम्हाला जनतेच्या दरबारात गेलं पाहिजे, असे आ. नीलेश राणे यांनी सांगितले.