

रत्नागिरी : जगभरात सगळीकडे ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. तसेच हा दिवस गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजनाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. कुटुंब लहान सुख महान, या वाक्याप्रमाणे प्रत्येक दाम्पत्यांनी कुटुंब नियोजनावर भर दिला पाहिजे, असे आवाहन जि.प. आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
भारतासह इतर अनेक देशांमध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. वाढत चाललेली लोकसंख्या कमी करण्यासाठी सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत. भारत हा जगातील सगळ्यात दाट लोकसंख्या असलेला देश आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. याच दिवसाची खास आठवण करून देण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. भारताची लोकसंख्या अब्जावधींच्या घरात आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १.४ अब्ज (१,४४१,९८१,७४४) ९ जुलै पर्यंत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतामध्ये जर अशीच लोकसंख्या वाढत राहिली तर २०३० पर्यंत भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याची शक्यता आहे. लोकसंख्येचा विषय गांभीर्याने घेण्यासाठी जगभरात सगळीकडे लोकसंख्या दिवस साजरा केला जात आहे.
१९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात करण्यात आली. सन १९८७ मध्ये लोकसंख्या जवळपास पाच अब्जांच्या घरात होती, तेव्हा अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त केली जाऊ लागली. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात होत्या. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. गर्भनिरोधक गोळ्या यामध्ये माला एन ही गोळी रोज घ्यावी लागते किंवा छाया गोळी ही आठवड्यातून एकदा घ्यावी लागते. गर्भनिरोधक इंजेक्शन दर ३ महिन्याला घ्यावे लागते.
ओळख नव्या विकसित भारताची, कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची या थीमनुसार तसेच कुटुंब लहान, सुख महान या उक्तीप्रमाणे प्रत्येक दाम्पत्यांनी कुटुंब नियोजनावर भर दिला तर आनंदी व आरोग्यमय जीवन जगता येणे शक्य होईल.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी