

चिपळूण : महसूल विभागात काम करून खेळाची आवड जोपासणार्या शिल्पा शृंगारे यांनी रत्नागिरी महसूल विभागाला विजेतेपद मिळवून दिले आहे. व्हॉलीबॉल, थ्रो बॉल या क्रीडा प्रकारात त्यांनी नैपुण्य मिळविले असून, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर अनेक बक्षिसे पटकावली आहेत. मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील असणार्या महिला खेळाडू आज महसूल विभागात प्रशासकीय सेवा देताना आपली खेळाची आवडदेखील जोपासत आहेत. गिज्जेवार कुटुंबाच्या त्या सूनबाई असून, मंडल अधिकारी उमेश गिज्जेवार यांच्या पत्नी आहेत. पती-पत्नी दोघेही महसूल विभागात सेवा देत असताना त्यांनी खेळाचा छंददेखील जोपासला आहे.
शिल्पा शृंगारे यांचा जन्म 23 मे 1987 रोजी झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील शाहू कॉलनी येथील तु. बा. नाईक गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर येथे त्यांनी पहिली ते चौथीचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षक शाहू हायस्कूल, कागल येथे झाले. पुढे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे झाले. लहानपणापासूनच खेळामध्ये आवड असल्याने घरच्यांनी व्हॉलिबॉल क्रीडा प्रकारामध्ये आवड ओळखून संधी दिली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या युवक सेवा संचालनालय विभागातर्फे घेण्यात आलेल्या 14 वर्षीय व्हॉलिबॉल स्पर्धेत पन्हाळा येथे विजय मिळविला. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम विजय मिळविला. कागल तालुक्यात होणार्या विविध क्रीडा स्पर्धा तसेच शासकीय क्रीडा स्पर्धेत विजय मिळवून खेळाचा छंद जोपासला. गारगोटी येथे झालेल्या 17 वर्षांखालील स्पर्धेतदेखील विजेतेपद पटकावले. महाविद्यालयात असताना देखील खेळाचा छंद कायम जोपासला. शिवाजी विद्यापीठांतर्गत क्रीडा स्पर्धेत अनेकदा यश मिळाले.
त्यानंतरच्या काळात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा निवड समितीतर्फे लिपीक भरती खेळाडू कोट्यातून झाली व त्या ठिकाणी 2007 मध्ये महसूल शाखेत नोकरी मिळाली. महसूल विभागातील कामातूनही खेळाची आवड जोपासली. महसूल विभाग अंतर्गत थ्रो बॉल क्रीडा प्रकारात रत्नागिरी संघाचे प्रतिनिधीत्व करीत कोकण विभागस्तरावर 2007 पासून 2025 पर्यंत रत्नागिरी जिल्हा अजिंक्य राहिला. तसेच राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत कोकण विभागाचे प्रतिनिधीत्व करताना कोकण विभागाला विजय मिळवून दिला. वेंगुर्ला येथे झालेल्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत जिल्हा अंतीम विजेता ठरला. राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड येथे कोकण विभागाला उपविजेतेपद मिळाले. कोकण विभागीय संघाचे कर्णधार म्हणून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान देखील झाला.