

गुहागर : आमदार भास्कर जाधव हे सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन जाणारे व सर्वांना सामावून घेणारे आमदार आहेत. त्यांच्यावर कुणीही उठून आरोप करीत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा गुहागरचे माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
गुहागर तालुक्यातील कृष्णा वने यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर ते विशिष्ट समाजातील लोकांना बरोबर घेऊन जातात, असा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करण्यासाठी जयदेव मोरे यांनी उद्धवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोरे बोलत होते. गुहागर नगरपंचायत आल्यानंतर आपण ओबीसी गटाचा असून सुद्धा आ. भास्कर जाधव यांनी मला गुहागर नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान दिला. तसेच स्नेहा वरंडे यादेखील नगराध्यक्ष झाल्या.(Maharashtra assembly poll)
पंचायत समिती सभापती म्हणून राजेश बेंडल यांनासुद्धा मान मिळाला होता. ही मंडळी ओबीसी गटातील आहेत, हे कृष्णा वने यांनी पाहावे. आमचा पक्ष, आमचे विचार व आ. जाधव हे संविधान मानणारे आहेत आणि संविधानानुसारच चालणारे आहेत. कोणीही यावे व आ. जाधव यांच्यावर आरोप करावेत, हे आम्ही खपवून घेणार नाही. पत्रकार परिषदेला उबाठा सेनेचे स्नेहा वरंडे, सारिका कनगुटकर, स्नेहा भागडे, सुधाकर सांगळे उपस्थित होते.