Wild flowers : रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला! रत्नागिरीतील सड्यांवर रानफुलांचा रंगोत्सव!

जिल्ह्यात रानफुलांची रंगीबेरंगी 'वेलबुट्टी'
Wild flowers
Wild flowers
Published on
Updated on

रत्‍नागिरी :

हिरवी नाजुक रेशीम पाती, दोन बाजूंनी सळसळती

नीळ नीळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती

कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेच्या या ओळी वाचताना डोळ्यांसमोर जो निसर्गाचा विलोभनीय कॅनव्हास उभा राहतो, तोच कॅनव्हास सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमधील सड्यांवर प्रत्यक्षात अवतरला आहे. पावसाच्या अधून-मधून बरसणार्‍या सरी ओसरल्यावर, इथल्या तांबड्या मातीच्या सड्यांनी जणू हिरवा शालू नेसला आहे. त्यावर विलोभनीय रानफुलांची रंगीबेरंगी 'वेलबुट्टी' साकारली आहे.

साताऱ्याचे 'कास पठार' आणि कोल्हापूरचे 'मसाई पठार' यांनी आजवर आपल्या रानफुलांच्या सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे; पण आता रत्नागिरी परिसरातील सडेही "आम्ही देखील पाठीमागे नाही, येवा आमचो सौंदर्य न्याहाळा!" अशी प्रेमळ साद पर्यटकांना घालत आहेत. साडवली, जैतापूर, देवाचे गोठणे, नाटे अशा २० ते २२ हून अधिक सड्यांवर सध्या निसर्गाने विविध रंगांच्या रानफुलांची अक्षरशः उधळण केली आहे. या सड्यांवर सध्या दीपकाडी, कंदीलपुष्प, कुमुदिनी, रानहळद, विविध अमरी, चोहळा, परजीवी वाढणारे आकर्षक तुरे, केना अशा कितीतरी रानफुलांनी बहर आणला आहे.

'सह्याद्री संकल्प सोसायटी'चे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे या सौंदर्याविषयी सांगताना म्हणतात, साडवलीच्या सड्यावर एकदांडी ही कंदवर्गीय वनस्पती सध्या फुलली आहे. या प्रजातीचा 'देवरुखेन्स' हा एक नवा वाणही समोर आला आहे. पावसाळ्यातील एक-दोन महिने आपले मनमोहक रूप दाखवून या वनस्पती पुन्हा जमिनीत सुप्तावस्थेत जातात.

ओहोळांच्या कडेला वाढणारी 'चोहळा’ ही आलेवर्गीय वनस्पती सध्या निसर्गाच्या कुशीत फुलली आहे. औषधी गुणधर्म असलेली ही वनस्पती आता दुर्मिळ आणि धोकाग्रस्त प्रजातींमध्ये मोडते. गुलाबी कापरी कमळ जैतापूर, नाटे आणि धाऊलवल्ली अशा १० ते १२ गावांच्या परिसरातील सड्यांवर पाहायला मिळते. डॉ. अरुण चांदोरे व डॉ. श्रीरंग यादव यांनी शोधून काढलेली ही वनस्पती सुंदर आहे. तिला पाणतिळवण असेही म्हणतात. तिची नाजूक गुलाबी फुले वार्‍यावर डोलताना पाहून त्या सौंदर्यात हरवायला होतं. एकाचवेळी ताटवे फुलल्याने संपूर्ण सडे गुलाबी रंगात न्हाऊन निघाले आहेत.

वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रताप नाइकवडे सांगतात, साडवली आणि आंबोलीच्या सड्यांवर 'गुलाबी भुईचक्र' ही वनस्पती आढळते. दीपकाडीच्या आधी फुलणारी ही अतिशय सुंदर फुले, सड्यावर जणू एक गुलाबी चादरच अंथरतात. तिला तिची एक वेगळी व स्वतंत्र ओळख आहे. हे सौंदर्य केवळ पाहण्यासाठी नाही, तर जपण्यासाठीही आहे. याच उद्देशाने सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे गेली अनेक वर्षे 'फुलोत्सव' साजरा केला जात आहे. या सड्यांची आणि दुर्मीळ रानफुलांची जपणूक करणे ही आता आपली सर्वांचीच सामूहिक जबाबदारी बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news