

Looting Apta Leaves Dussehra
दीपक कुवळेकर
रत्नागिरी : दसर्याच्या दिवशी घरोघरी शस्त्रांची, पुस्तकांची, लक्ष्मीची आणि वाहनांची पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण दाराला बांधतात. तसेच दुकानांना, वाहनांना हार बांधला जातो. तसेच या दिवशी आपट्याच्या पानांनादेखील खूप महत्त्व असते. दसर्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची पंरपरा आहे. ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असे म्हणत एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसर्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. गुरुवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मंदिरात सोनं लुटण्याची परंपरा पहायला मिळणार आहे.
गावा गावांत आपट्याची पानं लुटण्याचे मुख्य प्रकार म्हणजे पानं वाटणे. दसर्याला गावातील सर्व लोक एकत्र येऊन गाव देवळात हा कार्यक्रम करतात. यावेळी आपट्याची पानं आणून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर हे सोनं घेण्यासाठी बालगोपाळांपासून वृद्धापर्यंत चढाओढ पाहायला मिळते. अक्षरश: ते लुटलच जातं. यानंतर ही पानं घरी नेऊन एकमेकांना देऊन कुटुंबाची भरभराट होवो, अशी सदिच्छा दिली जाते.
दसर्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. विजयादशमी म्हणजे दसर्याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात?
कौत्स हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता. या कौत्साने गुरुकुल पद्धतीने ज्ञान संपादन केले. गुरूला दक्षिणा घेण्याच्या वेळेस शिष्याच्या प्रगतीवरच समाधान मानणार्या वरतंतु ऋषींनी त्याला नकार दिला. मात्र, कौत्साच्या आग्रहाखातर त्यांनी सांगितले की मला एकाच स्रोताकडून मिळालेल्या 14 कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. कौत्साने रघुराजापुढे हात पसरले पण त्याने नुकतीच सर्व संपत्ती यज्ञात दान केली होती. मात्र, दारी आलेला याचक रिकाम्या हाती पाठवणे योग्य न वाटल्याने पराक्रमी रघुराजाने कौत्साकडे काही वेळ मागितला. त्याने कुबेरावर हल्ला करून संपत्ती मिळवायची आणि दान करायची अशी शक्कल लढवली.
पण या गोष्टीची खबर लागताच कुबेराने राजाला सांगितले की, तीन दिवसांत तो स्वखुशीने ही मागणी मान्य करेल आणि कौत्साला सुवर्णमुद्रा मिळतील. विजयादशमीच्या अर्थात दसर्याच्या दिवशी जंगलात कौत्स आपटयाच्या झाडाजवळ असतानाच त्या झाडावर सुवर्णमुद्रांचा खच पडला. आनंदाने कौत्साने विनंती केल्यावर त्याच्या गुरुदेवांनी 14 कोटी मुद्रा घेतल्या तरीही असंख्य मुद्रा पानोपानी शिल्लक राहिल्या होत्या. गुरुदक्षिणा दिल्याच्या समाधानात कौत्साने गुरूंच्या आदेशावरून बाकी मुद्रा पानांसकटच झाडावरून तोडून इतरांना वाटल्या. म्हणून आजही दसर्याच्या दिवशी सोन्याच्या रूपात आपट्याची पानं वाटण्याची प्रथा कायम आहे.