

रत्नागिरी : रिलायन्स कंपनीसह अन्य उद्योगांसाठी वाटद पंचक्रोशीत प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या भूसंपादनासाठी शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयात जनसुनावणीला सुरुवात झाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपली घरे, धार्मिक स्थळे आणि वर्षानुवर्षे जपलेल्या आंबा-काजू बागायती वगळण्याची जोरदार मागणी केली. यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शवली असून, एमआयडीसीनेदेखील प्रस्तावित प्रकल्प प्रदूषणविरहित असतील, असे लेखी आश्वासन दिले आहे.
वाटद परिसरात सुमारे 904 हेक्टर जमिनीवर एमआयडीसी प्रस्तावित असून, यासाठी नुकतीच संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. या भूसंपादनाविरोधात ग्रामस्थांच्या हरकती आणि सूचना ऐकून घेण्यासाठी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी सुरू झाली आहे. शुक्रवारी कोळिसरे आणि मिरवणे गावातील ग्रामस्थांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. नोटिसा बजावलेल्या खातेदारांपेक्षाही अधिक संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. आमची घरे आणि देवस्थाने कोणत्याही परिस्थितीत वगळण्यात यावीत. पिढ्यानपिढ्या ंसांभाळलेल्या बागायती आमच्या उदरनिर्वाहाचे साधन आहेत, त्यांना धक्का लावू नये, अशी आग्रही भूमिका अनेकांनी घेतली. याशिवाय, योग्य मोबदला, गावातील पायवाटांचे जतन आणि पाणीपुरवठा योजनांवर होणार्या परिणामांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.
स्थानिक तरुणांनी रोजगाराच्या मुद्द्यावर अधिकार्यांना बोलते केले. प्रकल्पात स्थानिकांना नोकरी मिळणार का? त्यासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देणार का? असे थेट प्रश्न विचारले. यावर अधिकार्यांनी, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना योग्य न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. प्रस्तावित 904 हेक्टरपैकी सुमारे एक हजार एकर जागा रिलायन्सच्या प्रकल्पासाठी दिली जाणार असून, उर्वरित जागेत आणखी दोन उद्योग येण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे आणि कार्यकारी अभियंता सचिन राक्षे उपस्थित होते. दरम्यान, पुढील सुनावणी सोमवारी (दि. 7) कळझोंडी गावासाठी होणार आहे.
सुनावणी दरम्यान काही ग्रामस्थांच्यात तू-तू, मै-मै ही झाली. यावेळी प्रांताधिकार्यांनी सर्वांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थांनी एकमेकांविरोधात न बोलता प्रशासनाशी बोलावे असेही या सुनावणी दरम्यान काहींचे कान टोचले.