

दापोली : दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वाकवली शाळा क्र. 1 या शाळेला देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये स्थान मिळाले आहे. या शाळेचा ‘पीएम श्री शाळा’ योजनेंतर्गत देशात सन्मान करण्यात आला. दिल्ली येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यात येथील शिक्षकांसह ग्रामस्थ, महिला सहभागी झाल्या होत्या.
शाळेला मिळालेला हा सन्मान दापोली तालुक्यासह जिल्ह्याचा असून या सन्मानात अनेकांचे परिश्रम दडले आहेत. इयत्ता पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी ही शाळा 1896 साली स्थापन झाली. या शाळेला ब्रिटिशकालीन इतिहास आहे. तर या शाळेत साने गुरुजी यांच्या देखील पाऊलखुणा आहेत. डीजिटल क्लासरूम, सीसीटीव्ही, इंटरनेट, आधुनिक ग्रंथालय, सोलर पॅनल, सेल्फी पॉईंट, योगा शिबीर, आर्थिक साक्षरता उपक्रम आणि आरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमांचीअंमलबजावणी इथे करण्यात आली. त्यामुळे शाळेने आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा जिल्ह्यात उमटविला आहे. मंगळवारी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित समारंभात केंद्रीय शिक्षण मंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या शाळेला ‘पीएम श्री’ शाळा म्हणून राष्ट्राला समर्पित करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने होणार्या या समारंभाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, जयंत चौधरी (शिक्षण व कौशल्य विकास मंत्री), खासदार पियुष गोयल व आमदार योगेश सागर यांची उपस्थिती होती.
रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण 16 शाळांची निवड झाली होती. त्यामधून लांजा, झरेवाडी आणि वाकवली या तीन प्राथमिक शाळांचा राज्यस्तरावर विचार करण्यात आला. केंद्राच्या अंतिम फेरीत वाकवली शाळेने प्रश्नावली व नवोपक्रमांमधून सर्वोत्तम ठरून राष्ट्रीय मानांकन प्राप्त केले.कधी काळी ‘सुतार शाळा’ म्हणून ओळखली जाणारी ही शाळा आज डिजिटल शिक्षणाच्या युगातही स्वतःचं स्थान टिकवून आहे. विद्यार्थ्यांमध्ये कार्यकुशलता, इतिहास व वारसा यांची ओळख आणि जीवन कौशल्यावर आधारित शिक्षण यासाठीही शाळा ओळखली जाते.