हुतात्मा अनंत कान्हेरे : स्वातंत्र्याच्या जाज्वल्य ज्योतीला कोकणातून सलामी

जन्मगावाकडे अद्याप दुर्लक्ष ; स्मारकासाठी ग्रामस्थांची आर्त मागणी
Villagers' strong demand for martyr Anant Kanhere memorial
हुतात्मा अनंत कान्हेरे : स्वातंत्र्याच्या जाज्वल्य ज्योतीला कोकणातून सलामीFile Photo
Published on
Updated on

खेड : अनुज जोशी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक तेजस्वी दीप, हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे क्रांतीचे रणशिंग फुंकणारा हा कोकणातील पुत्र. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये जुलमी अधिकारी जॅक्सनचा वध करणारा आणि १९ एप्रिल १९१० रोजी हसत हसत फासावर झुलणारा एक असामान्य योद्धा!

मात्र आज त्याच्या जन्मगावाकडे बघताना हृदयात वेदनांचा काहूर उठतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आयनी मेटे हे गाव – जिथे कान्हेरे यांचा जन्म झाला. तिथे ना भव्य स्मारक, ना सरकारचा ठसा. त्यांच्या निवासस्थानावर ग्रामपंचायतीने उभारलेली इमारत आज धुळीने माखलेली, पडझड झालेली आणि उपेक्षित आहे. हे दृश्य या थोर क्रांतिकारकाच्या स्मृतीला काळिमा फासणारे आहे.

क्रांतीची ज्वाला आणि हृदयात धगधगतं स्वप्न

अनंत कान्हेरे यांचं बालपण इंदूर व औरंगाबाद येथे शिक्षण घेतानाच देशासाठी झपाटून गेले. इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध उभ्या असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या गुप्त संघटनांशी त्यांचा संपर्क आला. काशिनाथ टोणपे, दत्तू जोशी, अण्णा कर्वे यांच्यासारख्या सहकाऱ्यांसह त्यांनी ‘ब्रिटिशांच्या अन्यायाला उत्तर’ देण्याची तयारी केली.

त्यांनी जॅक्सनच्या हत्येपूर्वी अनेकदा नाशिक गाठून नियोजन रचले. शेवटी २१ डिसेंबर १९०९ रोजी, नाटकगृहाच्या ओट्यावरून जॅक्सनवर चार गोळ्या झाडून, आपल्या शौर्याचा धगधगता ठसा स्वातंत्र्याच्या इतिहासावर उमटवला. घटनेनंतरही ते पळून गेले नाहीत. ते ब्रिटिशांच्या ताब्यात गेले आणि फाशीची शिक्षा स्वीकारली.

जन्मगावी जिवंत स्मृतीची हाक

कान्हेरे यांच्या गावात त्यांच्या नावाने एक विद्यालय सुरू आहे. माजी मंत्री रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांतून सभागृहाची डागडुजी झाली असली तरी गावकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे. “हीच का थोर हुतात्म्याची ओळख?” आज त्यांच्या मूळ जागेवर भव्य स्मारक उभारून भावी पिढीसाठी प्रेरणास्थान निर्माण करण्याची निकड वाटते.

“आम्ही त्यांच्या नावे विद्यालय चालवतो, पण त्यांच्या जन्मस्थळी साजेसे स्मारक उभं राहणं ही काळाची गरज आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे,” असे भावनिक उद्गार चंद्ररेखा कान्हेरे यांनी काढले.
"कान्हेरे यांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक व्हावे" : चंद्ररेखा कान्हेरे (पणतू)

... आणि एक प्रश्न अनुत्तरित राहतो

हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या बलिदानाचे स्मारक कधी उभारले जाईल?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news