

गुहागर शहर : गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या विरोधातील आपल्याकडे असलेले सर्व पुरावे द्या, आपण योग्य ती चौकशी करून सावंत यांच्यावर कारवाई करू, या अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या आश्वासनानंतर प्रजासत्ताक दिनापासून तीन दिवस सुरु असलेले उपोषण अडूर बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी स्थगित केले. मात्र, येत्या 15 दिवसांत याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्यास आपण राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा बौद्धजन सहकारी संघ, अडूर शाखा क्र. 4 ने प्रशासनाला दिला आहे.
पोलिस प्रशासनाने गुहागर तालुक्यातील अडूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिनी बौद्ध विहारला ठाळे ठोकणे, सशस्त्र पहारा ठेवणे पूजापाठापासून वंचित ठेवल्याने गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या बदलीच्या मागणीसाठी बौद्धजन सहकारी संघ, अडूर (स्थानिक) शाखा क्र. 40 च्या ग्रामस्थांनी 26 जानेवारीपासून गुहागर तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. ग्रामस्थांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी तहसीलदार परीक्षित पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. राजमाने यांनी प्रयत्न केले. मात्र, पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांची बदली होत नाही, तो पर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
दरम्यान, मंगळवारी दुपारी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपोषण स्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रथम गुहागर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस प्रशासनाची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार परीक्षित पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने होते. यावेळी उपोषणकर्त्यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. यावर आपण मांडलेल्या मुद्यानुसार व आपल्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनातील मुद्यांची सविस्तर चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे लेखी पत्र अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांना दिले.