

चिपळूण शहर : चिपळुणातील वाशिष्ठी दूध प्रकल्पातर्फे आयोजित कृषी महोत्सवात अस्सल कोकणी परंपरा दर्शविण्यात आल्या आहेत. त्याला रसिकांचा मोठा प्रतिसाददेखील लाभत आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, नागरिक तसेच ग्रामीण भागातील लोक या प्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत आणि येथील कृषी प्रात्यक्षिके, कोकणी राहणीमान, कृषी प्रदर्शन आणि कृषी साहित्याची खरेदी करीत आहेत.
शहरातील चिपळूण न.प.च्या स्वा. सावरकर मैदानात दि. 9 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहाणार आहे. यावर्षी कृषी प्रदर्शनाची भव्यता मोठी आहे. भव्य सभामंडप या शिवाय 200 स्टॉल्स राहतील अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचपद्धतीने या कृषी प्रदर्शनात कोकणी परंपरा प्रदर्शित झाली आहे. कोकणी शेतकऱ्याचे चिकणमातीचे दुमजली घर साकारण्यात आले आहे. या घराचे वैशिष्ट्य म्हणजे, ओटी, पडवी, माजघर, देवघर अशी पारंपरिक रचना करण्यात आली आहे. याशिवाय अंगण, विहीर, परसबाग, माळा व पारंपरिक दरवाजे, कडी-कोयंडे, खिडक्या असे परंपरागत साहित्य वापरण्यात आले असून या प्रदर्शनात हे घर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
याशिवाय गाईगुरांचा गवतारू गोठा, एक झोपडी, खुला गोठा, मचाण साकारण्यात आली आहे. बैलगाडा, बांबूपासून बनविलेले प्रवेशद्वार आणि त्यावर फिरणारी पवनचक्कीची प्रतिकृती प्रदर्शनास येणाऱ्या प्रत्येकाची नजर आकर्षित करून घेत आहे. यावर्षी प्रथमच थेट कृषी प्रात्यक्षिके करण्यात आली आहेत. चारा प्रात्यक्षिके व अन्य पिकांची प्रात्यक्षिके, परसबाग या ठिकाणी प्रत्यक्षात करण्यात आली आहे, तर शहरी भागासाठी ऑल गार्डन ही नवी संकल्पना या प्रदर्शनात उपस्थितांना पाहायला मिळत आहे.
या शिवाय बैलगाडा शर्यतीत लागणारे बकासूर, लखन हे बैल या प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. तसेच पारंपरिकता जपणारा गोंधळी, वासुदेव उपस्थितांचे मनोरंजन करीत आहेत. या शिवाय शुभ्र पांढरे घोडे, उंट यांची सवारी करण्याची संधीदेखील लोकांना मिळत आहे. खवय्यांसाठी खास खाऊ गल्ली साकारण्यात आली आहे तर दररोज रात्री मनोरंजनाचे भव्य कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सहली प्रदर्शनाला भेट देत असून कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आवर्जून भेट देत आहेत. कोकण परंपरा, लोककलांचा जल्लोष साजरा होत असून या कृषी महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.