Ratnagiri Rain : अवकाळी पावसाने आंबा-काजू बागांना कीड-रोगांचा धोका

ढगाळ वातावरणात बागायतदारांनी घ्यावी काळजी; दापोली कृषी विद्यापीठाचा सविस्तर कृषी सल्ला
Mango Kaju Crop
Mango Kaju CropPudhari
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू बागांमध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या विस्तार शिक्षण संचालनालयाने ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीसाठी बागायतदारांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठाने आंबा आणि काजू पिकांच्या संरक्षणासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आंबा बागेतील कीड-रोग व्यवस्थापन

२३ व २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक बागांमध्ये नवीन पालवी येत असून, कोवळ्या फुटींवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. प्रादुर्भाव दिसताच १० लिटर पाण्यात लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. मिसळून फवारणी करावी

ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्यांची उत्पत्ती वाढण्यासह पालवीवर काळी बुरशी येण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात डेल्टामेथ्रीन ९ मि.ली. किंवा टॉलफेनपायराईड २० मि.ली. मिसळून फवारणी करावी. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १२ टक्के आणि मॅन्कोझेब ६३ टक्के या तयार मिश्रणाची २० ग्रॅम मात्रा १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.औषधाचे द्रावण पालवीवर व्यवस्थित पसरून टिकून राहण्यासाठी त्यात स्टीकर आणि स्प्रेडरचा वापर करावा. आगामी आठवड्यात तापमानात घट होण्याचा अंदाज असल्याने आंब्याला मोहोर फुटण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यताही विद्यापीठाने वर्तवली आहे.

काजू बागांची निगा राखण्याचे आवाहन

काजूच्या वेंगुर्ला-१, ४, ७, ९ आणि १० या वाणांना नवीन पालवी फुटत असून काही झाडांवर मोहोर दिसू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी १० लिटर पाण्यात लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मि.ली. मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काजू बागेतील झाडांच्या बुंध्याभोवतीचे गवत काढून परिसर स्वच्छ ठेवावा. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी बुंध्याभोवती सेंद्रिय किंवा जैविक आच्छादन करावे. आगामी काळात थंडी वाढल्यास काजूच्या मोहोराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अधिक तांत्रिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी डॉ. वैभव शिंदे (९४२२४ २५७२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.