

Wild Fruits Damage in Konkan Unseasonal Rain
रत्नागिरी : कोकणातील रानमेव्याला बदलत्या वातावरणाचा यावर्षी चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसाने रानमेव्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यंदा रानमेवा बाजारात आलाच नाही. फक्त २० ते ३० टक्केच हा मेवा बाजारात पाहायला मिळाला. गेल्या अनेक वर्षाचा इतिहास बघितला तर असे प्रथमच झाल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
कोकणात आंबा, काजू, कोकम, सुपारी, नारळ ही प्रमुख फळपिके असली तरी याशिवाय जांभूळ, करवंद, रायवळ आंबा, तोरणं, अळू इत्यादी सहज मिळणारा रानमेवा आहे. हा रानमेवा साधारण मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात बाजारात दाखल होतो. विशेष करून जांभूळ व करवंदाला मोठी मागणी असते. निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व अवकाळी तसेच वातावरणातील बदलाच्या परिणामाचा यंदा पुन्हा एकदा आंबा उत्पादनांबरोबरच या रानमेव्यावर झाला आहे.
सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे झाडावरची जांभळे खाली पडून वाया गेली आहेत. त्यामुळे यंदा जांभूळ पिकावर मोठे संकट आले आहे. यावर्षी उशिराने जांभूळ पिकले असून, विक्री हंगाम उशिराने सुरू झाला होता. मे च्या साधारण १४ ते १५ तारखेला अवकाळी पावसाने सुरूवात केली. ऐन रानमेव्याच्या भरातच हा पाऊस झाल्याने हा रानमेवा बाजारात आलाच नाही. या कालावधीत लाखो रुपयांची उलाढाल रानमेवा करून देतो. परंतु अवकाळीमुळे ही उलढाल थांबली. जांभुळ, करवंद, फणस ही फळं सध्या अतिपावसामुळे खराब झाली आहेत. यामुळे रानमेवा विकून संसाराचा गाडा हाकणार्या अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
राज्यात तसेच राज्याबाहेर कोकणातील कोकमला मोठी मागणी आहे. परंतु, यावर्षी यालाही अवकाळीचा फटका बसला आहे. पिकलेली कोकम पावसामुळे पडून गेली. तसेच कोकम काढल्यानंतर ते सुकवायला ऊनच न पडल्यामुळे ते कुजूनही गेले आहेत.